संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या दोन दिवसांवर आले असले, तरी ४० टक्के मतदारांनी नक्की कोणता पक्ष सत्तेवर येईल, याबद्दल काहीही सांगता येणार नसल्याचे चित्र एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. खासगी संस्थेने केलेल्या या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती भाजपलाच मिळाली आहे. त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वाखालील समाजवादी पक्षाला मतदारांनी पसंती दिली आहे.

‘इंडियास्पेंड’साठी ‘फोर्थलायन टेक्नॉलॉजीज’ने हे सर्वेक्षण केले आहे. राज्यात निवडणुकीनंतर कोणता पक्ष सत्तेवर येईल, यावर विचारलेल्या प्रश्नावर ४० टक्के मतदारांना काहीच सांगता आले नाही. उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या वयाच्या, जाती-धर्माच्या, भिन्न आर्थिक पार्श्वभूमीवर असलेल्या मतदारांची या सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली होती. एकूण २५१३ लोकांचे हे नमुना सर्वेक्षण करण्यात आले.

उत्तर प्रदेशमधील सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने पहिल्यापासूनच जोर लावला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी रणनिती आखत आहेत. याच रणनितीला यश येत असल्याचे या सर्वेक्षणातून दिसूल आले आहे. ज्यामध्ये सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मतदारांपैकी सर्वाधिक २८ टक्के लोकांनी भाजपच्या पारड्यात आपले मत टाकले आहे. निवडणुकीनंतर भाजप सत्तेवर येईल, असे भाकित या २८ टक्के नागरिकांनी वर्तविली आहे. त्याखालोखाल १८ टक्के नागरिकांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला पसंती दिली आहे. वडील मुलायम सिंह यादव यांच्यासोबत वाद झाल्यानंतर समाजवादी पक्षाची धुरा सध्या अखिलेश यादव यांच्याच खांद्यावर आलीये. त्यातच समाजवादी पक्षाने काँग्रेससोबत आघाडी केली आहे. त्यामुळे अखिलेश यादव या निवडणुकीत कशी कामगिरी करतात हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. उत्तर प्रदेशमधील सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बहुजन समाज पक्षाला फारच कमी लोकांनी पसंती दिली आहे. केवळ ४ टक्के लोकांनीच हा पक्ष पुन्हा सत्ता येण्याची शक्यता वर्तविली. काँग्रेसनेही निवडणुकीत स्वतःचे स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले असले, तरी त्या पक्षाला केवळ १ टक्के नागरिकांनीच पाठिंबा दिला आहे.

सर्वेक्षणानुसार, २२ टक्के मागासवर्गातील मतदार, इतर मागासवर्गातील ३३ टक्के मतदार आणि ११ टक्के मुस्लिम मतदार भाजपच्या बाजूने आहेत. तर समाजवादी पक्षाला २९ टक्के मुस्लिमांनी पाठिंबा दिला आहे. ही टक्केवारी सर्वाधिक असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक ४० टक्के मागासवर्गीयांनी बहुजन समाज पक्षाच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.