लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सोनिया गांधी यांची कन्या आणि राहुल गांधी यांची बहीण म्हणून अमेठी व रायबरेली या मतदारसंघांमध्ये प्रियंका गांधी यांनी आजवर काँग्रेसचा प्रचार केला आहे. पण आता त्यांना पहिल्यांदाच औपचारिकपणे पक्षात पद देण्यात आले असून उत्तर प्रदेश पूर्व म्हणजेच पूर्वांचलमध्ये त्या काँग्रेसच्या महासचिव असतील. विशेष म्हणजे पूर्वांचलमधून नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे देखील निवडून येतात. त्यामुळे प्रियंका गांधी यांच्याद्वारे काँग्रेसने थेट मोदी आणि योगी दोघांनाही लक्ष्य केले आहे.

पूर्वांचलमधून निवडून येतात मोदी आणि योगी
पूर्वांचल भागातच वाराणसी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातून २०१४ मध्ये नरेंद्र मोदी लोकसभेवर निवडून गेले. तर याच भागातील गोरखपूर या लोकसभा मतदारसंघातूनच योगी आदित्यनाथही अनेक वर्ष खासदार होते. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता.

पूर्वांचलवर भाजपाचा दबदबा
२०१४ मध्ये मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवत विरोधी पक्षांना हादरा दिला होता. तर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी तीन दिवस पूर्वांचलमध्ये होते. भाजपाने पूर्वांचलवर जोर दिल्याने लोकसभा निवडणुकीत या भागातील फक्त आझमगडची जागा समाजवादी पक्षाला मिळाली होती. उर्वरित जागांवर भाजपाचे वर्चस्व होते. या भागात लोकसभेच्या एकूण २६ जागा असून यातील २५ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते.

भाजपा विरुद्ध सपा- बसपा आघाडी विरुद्ध प्रियंका गांधी
उत्तर प्रदेश पूर्वची जबाबदारी प्रियंका गांधींकडे सोपवणे ही काँग्रेसची खेळी असल्याचे दिसते. पूर्वांचलवर भाजपाचे वर्चस्व असले तरी यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी आघाडी केली आहे. या महाआघाडीचा फटका भाजपाला बसण्याची चिन्हे आहेत. भाजपाकडून जुन्या उमेदवारांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर महाआघाडीतर्फे नवीन चेहरे दिले जाण्याची शक्यता आहे. गोरखपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाआघाडीमुळे भाजपाचा झालेला पराभव हे याचे उदाहरण आहे. पूर्वांचलमध्ये काँग्रेसचा उमेदवार ज्या मतदारसंघात असेल तिथे भाजपाला फटका जास्त बसेल, असे उत्तर प्रदेशमधील राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पूर्वांचलमध्ये ब्राह्मण मतदारांचे वर्चस्व आहे. पूर्वांचलमधील प्रयागराज, वाराणसी, बलरामपूर, बहराइच, भदोही, फूलपूर, कुशीनगर, देवरिया, मिर्जापूर, जौनपूर, सुल्तानपूर या भागांमध्ये पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते. आता या भागातील ब्राह्मण आणि महिला मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळवण्यासाठी राहुल गांधी यांनी प्रियंका यांना मैदानात उतरवले आहे.