उत्तर प्रदेशमध्ये पोलिसानेच अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मुलीवर ओढावलेला हा प्रसंग बघून मुलीच्या वडिलांना मानसिक धक्का बसला. यात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला असून संतापलेल्या स्थानिकांनी रस्त्यावरुन आंदोलन केले. पोलिसांनी नराधम पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली असून पूराच्या पाण्यात अडकल्याने नराधमाला अटक करण्यात यश आले.

बलियामधील रेवती पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोपाळनगर पोलीस चौकीत धरम (३८) हा कार्यरत होता. वर्षभरापूर्वी तो गोपाळनगरमध्ये रुजू झाला होता. धरमने शुक्रवारी संध्याकाळी गावातील १५ वर्षाच्या मुलीला गाठले. ती शौचासाठी घरातून बाहेर पडली होती. धरमने पीडित मुलीला चौकीवरील गच्चीत नेले आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. गावातील तरुणांना हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी पीडित मुलीची सुटका केली. यानंतर त्यांनी धरमला मारहाणदेखील केली. पण संतप्त जमावाला बघून धरम तिथून पळून गेला. दुसरीकडे मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची माहिती तिच्या वडिलांना समजली. तिच्या वडिलांचे वय ६० वर्ष असून बातमी समजताच त्यांना मानसिक धक्का बसला आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनाला सुरुवात केली. संतप्त ग्रामस्थांमुळे धरमने गावातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दुचाकी घेऊन तो पळालाही होता. पण दुचाकी पूराच्या पाण्यात फसली आणि धरम पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी धरमविरोधात विनयभंग आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर बलियाच्या पोलीस अधीक्षकांनी धरमवर निलंबनाची कारवाई केली आहे. गावात तणावाचे वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.