दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे मंगळवारी रात्री उशिरा घडली. संदीप शर्मा (वय ३२) असे या मृत कार्यकर्त्याचे नाव आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. प्रत्यक्षदर्शींनी जखमी शर्मांना रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. हत्येमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. शर्मा हे मुळचे निकाऊ गावातील रहिवासी असून संघाचे महानगर पर्यावरण समितीचे अध्यक्ष होते. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलीस अधिक्षकांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. भाजपा आणि काही हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते रूग्णालयात मोठ्याप्रमाणात आले होते. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोर पांढऱ्या रंगाच्या अपाचे दुचाकीवर आले होते. या हल्ल्यात संदीप यांच्या पाठीला गोळी लागली होती. शर्मा हे जेवणकरून फिरायला घराबाहेर पडले होते. त्याचवेळी हा हल्ला करण्यात आला. शर्मा यांचे कोणाशी शत्रूत्व होते का याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. आरोपींना शोधण्यासाठी विशेष पथके नेमली असून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती आग्रा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजा श्रीवास्तव यांनी दिली. या आरोपींना पकडल्यानंतरच सर्व सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले.