उत्तर प्रदेशतील अनेक मोबाईल रिचार्ज विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये मुलींच्या मोबाईल नंबरचीदेखील विक्री केली जाते आहे. यासाठी मोबाईल रिचार्ज विक्रेते ५० ते ५०० रुपये आकारत आहेत. मुलींच्या सौंदर्यावरुन मोबाईल रिचार्ज विक्रेते त्यांच्या मोबाईल नंबरची किंमत ठरवत आहेत. यानंतर मागणीनुसार मुलींच्या मोबाईल नंबरची विक्री केली जाते आहे. रिचार्ज विक्रेत्यांच्या या प्रतापामुळे मुलींना मात्र प्रचंड मनस्ताप होतो आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

उत्तर प्रदेशातील अनेक मुलींना सध्या ‘मैत्रीसाठी’ फोन येत आहेत. त्यामुळे १०९० या हेल्पलाईनवर तक्रारींचा पाऊस पडला आहे. गेल्या ४ वर्षांमध्ये १०९० या हेल्पलाईनद्वारे तक्रार दाखल करणाऱ्या मुलींची संख्या ६ लाख इतकी आहे. विशेष म्हणजे यातील तब्बल ९० टक्के तक्रारी या मोबाईलवरुन कॉलच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे तरुणांना तरुणींचे मोबाईल नंबर पुरवणारे रिचार्ज विक्रेतेच संबंधित तरुणांना खोट्या ओळखपत्रांच्या आधारे सिम कार्ड्सची विक्री करत आहेत.

उत्तर प्रदेशातील अनेक मोबाईल रिचार्ज विक्रेत्यांकडून तरुणींच्या मोबाईल क्रमांकांची सर्रास विक्री सुरू आहे. रिचार्ज करण्यासाठी येणाऱ्या तरुणींचे मोबाईल नंबर विक्रेत्यांकडून तरुणांना विकले जात आहेत. मुलींच्या सौंदर्यावरुन त्यांच्या मोबाईल नंबरची किंमत विक्रेत्यांकडून ठरवली जाते आहे. ‘आम्ही त्या मुलींना मेसेज करतो. कधीकधी व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह छायाचित्रेदेखील पाठवतो,’ अशी माहिती एका तरुणाने दिल्याचे हिंदुस्तान टाईम्सने म्हटले आहे.

तरुणींच्या मोबाईल नंबर्सची विक्री करणाऱ्या आणि ते नंबर विकत घेणाऱ्या कोणाही विरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र खोट्या कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड्सची विक्री करणाऱ्या रिचार्ज विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यासोबतच मुलींना वारंवार त्रास देणाऱ्या तरुणांना ‘समज’ दिली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.