समाजवादी पक्षात काका – पुतण्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी डावलल्याचा आरोप करत शिवपाल यादव यांनी समाजवादी सेक्यूलर मोर्चाची स्थापना केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील मतभेद पुन्हा उफाळून आल्याने याचा फटका पक्षालाच बसणार अशी भीती कार्यकर्ते व्यक्त करत आहे.

समाजवादी पक्षात मुलायमसिंह यांचे बंधू शिवपाल यादव आणि मुलायमसिंहाचे चिरंजीव अखिलेश यादव यांच्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. अखिलेश यादव यांनी मला आणि माझ्या समर्थकांना डावलल्याचा आरोप करत शिवपाल यादव यांनी समाजवादी सेक्यूलर मोर्चा या संघटनेची स्थापना केली आहे. ही संघटना समाजवादी पक्षाच्या छत्राखालीच राहणार असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षनेतृत्वाकडून डावलल्या जाणाऱ्या वर्गाला आणि जातीला आम्ही आमच्या मोर्चात स्थान देऊ. याद्वारे आम्ही पक्षबांधणीच करत आहोत, असे त्यांनी सांगितले. आम्ही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो असून अन्य छोट्या पक्षांशीही आम्ही संपर्क साधू असे त्यांनी म्हटले आहे.

अखिलेश यादव यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत शिवपाल यादव पुढे म्हणाले, आमचे मत जाणून घेतले जात नाही, आम्हाला पक्ष बैठकीत बोलावले जात नाही, पक्षाचे कामही दिले जात नाही. म्हणून शेवटी सेक्यूलर मोर्चाची स्थापना केली.
शिवपाल यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओमप्रकाश राजभर याची भेट घेतली. याशिवाय त्यांनी अमरसिंह यांची देखील भेट घेतल्याचे वृत्त आहे.

चार महिन्यांपूर्वी शिवपाल यादव यांनी दिल्लीत पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांची भेट घेतली होती. या भेटीत २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी मतभेद मिटवून दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिवपाल यादव यांना पक्षात महत्त्वाचे पद दिले जाणार होते. मात्र चार महिन्यांमध्ये शिवपाल यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही स्थान मिळालेले नाही, याकडे शिवपाल यांच्या निकटवर्तीयांनी लक्ष वेधले. सप्टेंबर २०१६ मध्येही समाजवादीत अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला होता.