उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये शनिवारी रात्री खासदार स्मृती इराणी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची हत्या करण्यात आली होती.  बरौलिया गावात सुरेंद्र सिंह यांची अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. रविवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार स्मृती इराणी यांनी हजेरी लावत त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यावेळी स्मृती इराणी यांचे आश्रू अनावर झाले होते.

सुरेंद्र सिंह अमेठीतील बरौलिया गावाचे प्रमुख होते. शनिवारी रात्री उशीरा काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर गोळी झाडली अशी प्राथमिक माहिती आहे. उपचारासाठी त्यांना लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्मृती इराणी यांच्या प्रचारामध्ये सुरेंद्र सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.  सुरेंद्र सिंह यांचा प्रभाव अनेक गावांमध्ये असल्याने त्याचा स्मृती इराणी यांना लाभ मिळाला होता