उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात जमिनीच्या वादातून गोळीबार झाला आहे. या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जमिनीवरुन झालेल्या या हिंसाचारामध्ये २५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा पुरुष आणि तीन महिला आहेत.

घोरावल कोतवाली भागात उभ्भा गावात जमिनीच्या वादातून गोळीबार झाला आहे. गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर घोरावल पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहेत. गावात मोठया प्रमाणावर तणाव असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार विरोध असतानाही काही जण वादग्रस्त जागेमध्ये शेती करण्यासाठी पोहोचले. जेव्हा एका पक्षाने दुसऱ्या बाजूच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन शेतात काम करणे चालू ठेवले त्यावेळी वादग्रस्त जागेमध्ये शेती करणाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला.

आरोपीमध्ये गावच्या प्रमुखाचे नाव असल्याची माहिती आहे. गावच्या प्रमुखाने आयएएस अधिकाऱ्याकडून ९० बिघा जमीन विकत घेतली होती. खरेदी केलेल्या जागेवर गावच्या प्रमुखाने काम सुरु केले तेव्हा काही गावकऱ्यांनी त्याला विरोध केला. त्यावरुन दोन गटांमध्ये वादावादीला सुरुवात झाली असे पोलिसांनी सांगितले. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार गणेश आणि विमलेश या दोघांना अटक करण्यात आली असून ते गावच्या प्रमुखाचे नातलग आहेत. अन्य आरोपींचा शोध सुरु असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.