हरयाणामध्ये तरुणीचा पाठलाग केल्याची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीत १५ वर्षांच्या मुलीचा पाठलाग केल्याची घटना समोर आली आहे. मुलीचा पाठलाग करुन भरबाजारात तिच्यावर हल्ला केल्याची घटना घडली असून हल्लेखोराने तलवारीने मुलीचा एक हात कापला आहे. जमावाने हल्लेखोराला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. विनोद चौरसिया असे या हल्लेखोराचे नाव आहे.

लखीमपूर खेरीत नववीत शिकणारी मुलगी बुधवारी दुपारी बाजारपेठेतून जात होती. यादरम्यान वेल्डिंगच्या दुकानात काम करणाऱ्या विनोद चौरसियाने तिला गाठले. गेल्या काही दिवसांपासून तो त्या मुलीची छेड काढत होता. मुलीने पालकांनाही याची माहिती दिली होती. बुधवारीदेखील विनोदने तिची छेड काढली. मुलीने तिथून पळ काढताच विनोदने तिचा पाठलाग केला. हातात तलवार घेऊन विनोद तिचा पाठलाग करत होता. काही क्षणातच विनोदने तिला गाठले आणि तिच्यावर तलवारीने वार केला. हल्ल्यात तिचा डावा हात कापला गेला. यानंतर बाजारपेठेत उपस्थित असलेल्या काही धाडसी नागरिकांनी विनोदला रोखले आणि पुढील अनर्थ टळला. संतप्त जमावाने विनोदला चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. हल्ल्यात जखमी झालेल्या पीडित मुलीला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला लखनौतील रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी १० ऑगस्टरोजी बरेलीत दोन मुलींवर अॅसिड हल्ला झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली होती. मात्र महिलांवरील हल्ले रोखण्यात राज्यातील योगी सरकार अपयशी ठरत असल्याची टीका विरोधक करत आहे.