हिंदू तरुणीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप असलेल्या तीन मुस्लीम तरुणांना विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. बागपतमधील न्यायालयाच्या आवारातच हा प्रकार घडला असून पोलिसांनी सात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पंजाबमधील बरनाला येथे राहणाऱ्या हिंदू तरुणीचे तिच्या घराजवळ सलून चालवणाऱ्या कलीम (२५) नामक तरुणाशी सूत जुळले. दोघांच्याही घरून या लग्नाला विरोध असल्याने त्यांनी घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. यात त्याचे भाऊ नदीम (२६) आणि मुदसार (२८) यांनी देखील मदत केली. १० जानेवारी रोजी कलीम, त्याची प्रेयसी आणि दोघे भाऊ पंजाबमधून पळाले आणि दिल्लीत गेले. दिल्लीतील वकिलाने त्यांना बागपतमधील न्यायालयात जाऊन लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार हे सर्व जण बागपतमध्ये पोहोचले. तर, दुसरीकडे मुलीच्या कुटुंबीयांनी तिघांविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली.

रविवारी बागपतमधील न्यायालयात कलीम, संबंधित तरुणी आणि त्याचे दोन्ही भाऊ हे वकिलांचा सल्ला घेण्यासाठी आले होते. लग्न कसे करता येईल याची ते माहिती घेत होते. याच दरम्यान काही तरुण घोषणा देत तिथे पोहोचले. त्यांनी कलीम आणि त्याच्या भावांना जाब विचारला. यानंतर त्यांना बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे पोलिसांचे पथकही त्यावेळी तिथेच उपस्थित होते. मात्र पोलीसही त्यांच्या मदतीला धावले नाही.

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते सुनील चौहान म्हणाले, मुस्लीम तरुणांनी हिंदू तरुणीला पळवल्याची माहिती आम्हाला मिळाली. पीडित मुलीशी लग्न करुन तिचे धर्मांतर करण्याचा कट होता. आम्ही तातडीने तिथे पोहोचलो. त्या तरुणांनी कार्यकर्त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली आणि म्हणून प्रकरण बाचाबाचीपर्यंत गेले, असे त्यांनी सांगितले.