जेवर – बुलंदशहर महामार्गावरील बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधकांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्याचवेळी सरकारमधील मंत्री सुरेश खन्ना यांनी राज्य गुन्हेगारीमुक्त करणे अशक्य असल्याचे विधान करून हतबलता व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेश मोठे राज्य आहे. ते गुन्हेगारीमुक्त करणे अशक्य आहे, असे ते म्हणाले. गुन्हेगारीमुक्त राज्य करण्याचे आश्वासन आम्ही दिले नव्हते, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे.

सहारनपूरमध्ये जातीय हिंसाचार उफाळल्यानंतर विरोधकांनी योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. त्यानंतर जेवर – बुलंदशहर महामार्गावर बलात्काराच्या घटनेनंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. यावरून योगी सरकारवर सातत्याने टीका होत आहे. त्याचवेळी योगी सरकारमधील भाजप मंत्री सुरेश खन्ना यांनी विरोधकांना आयतेच कोलीत दिले आहे. उत्तर प्रदेश गुन्हेगारीमुक्त करणे अशक्य आहे. राज्य खूपच मोठे आहे. ते गुन्हेगारीमुक्त करू, असे आश्वासन आम्ही कधी दिलेच नव्हते, असे सांगून खळबळ उडवून दिली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. राज्यात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार स्थापन करण्यात आले. नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. एकीकडे मुख्यमंत्री गुन्हेगारी संपवण्याचे आश्वासन देत असताना, सरकारमधील मंत्री खन्ना यांनी राज्य गुन्हेगारीमुक्त करण्याचे आश्वासन दिले नसल्याचे वक्तव्य केले आहे. यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. दरम्यान, खन्ना यांनी या वक्तव्यानंतर सारवासारव केली आहे. मागील सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचे काम करत होते. राज्य गुन्हेगारीमुक्त करणे अशक्य असल्याचे म्हटले असले, तरी मी बलात्कारासारख्या घटनांबाबत बोललो असा त्याचा अर्थ होत नाही. या घटनेतील दोषींना नक्कीच शिक्षा दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.