उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये वीज विभागाचा मोठा बेजबाबदारपणा समोर आला आहे. वीज विभागाच्या बेजबाबदारपणाचा फटका एका शेतकऱ्याला बसला आहे. वीज विभागाने केलेल्या या कामगिरीमुळे शेतकऱ्यांच्या घरी एकच गोंधळ उडाला आणि त्याचं संपूर्ण कुटुंब चिंतेत पडलं. झालं असं की वीज विभागाने शेतकऱ्याला २६ लाखांचं वीज बिल पाठवलं. हे बिल पाहून शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला धक्काच बसला. त्यानंतर सरकारी काम थोडा वेळ थांब या म्हणीनुसार या शेतकऱ्याला वीज विभागाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागल्या. मात्र त्याची तक्रार ऐकून तिचं निरसन करण्याची तसदी कोणीही घेतली नाही. या संदर्भातील बातमी समोर आल्यानंतर वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून या वीज बिलामध्ये बदल करण्यात येणार आहे.

झालं असं की गंगा घाट पोलीस स्थानकाच्या क्षेत्रात येणाऱ्या बेहटा गावामध्ये राहणाऱ्या रामू राठोर या शेतकऱ्याच्या घरी चार डिसेंबर रोजी २६ लाख रुपयांच बील आलं. एवढ्या मोठ्या रकमेचं बिल पाहून रामूच्या घरचे सर्वचजण चक्रावले. त्यानंतर या बिलासंदर्भात विचारपूस करण्यासाठी रामू जवळजवळ रोज विज विभागाच्या फेऱ्या मारत होता. मात्र कोणाही त्याची तक्रार गांभीर्याने घेत नव्हतं. रामूने न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार तो भूमिहीन शेतकरी आहे. त्याला पाच मुली असून सर्वांच्या लग्नाची जबाबदारी त्याच्या एकट्याच्या खांद्यावर आले. मला एवढं बिल कसं आलं मला ठाऊख नाही असं रामूने म्हटलं आहे. वीज विभागाचे अधिकारी मला केवळ आश्वासन देत असून पुढे काहीच घडत नाहीय असंही रामूने म्हटलं आहे.

वीज विभागातील अधिकारी उपेंद्र तिवारी यांच्याकडे यासंदर्भात विचारपूस केली असता त्यांनी हे प्रकरण आपल्यापर्यंत पोहचल्याचं त्यांनी सांगितलं. या शेतकऱ्याच्या वीज बिलामध्ये झालेली चूक तात्काळ सुधारण्यात येणार आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने या शेतकऱ्याला २६ लाखांचं बिल पाठवण्यात आलं. कधी कधी मीटरमध्ये आठ हजारऐवजी ८० हजार यूनिट दाखवले जातात, असंही तिवारी यांनी म्हटलं. अशी अन्य काही प्रकरणही समोर आली असून लवकरच यामध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचे वीज अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.