देशात तिहेरी तलाकविरोधात कडक कायदा करण्यात आला आहे. मात्र अद्यापही तिहेरी तलाकशी संबंधित प्रकरणं कमी होताना दिसत नाही आहेत. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात तिहेरी तलाकशी संबंधित एक प्रकरण समोर आलं आहे. येथे राहणाऱ्या शहनाज नावाच्या महिलेने १७ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

महिलेने तक्रारीत सांगितलं आहे की, १० ऑगस्ट रोजी आपल्या नातेवाईकांसोबत बाजारात खरेदी करुन परतत असताना आपला पती फखरुद्दीन तिथे पोहोचला. फखरुद्दीनने भरबाजारात सर्वांसमोर तीन वेळा तलाक शब्द उच्चारला आणि तिथून फरार झाला.

त्यादिवशी घरी पाहुणे आले असल्या कारणाने शहजाजने पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. फखरुद्दीनने खिल्ली उडवत तिहेरी तलाक कायदा आपलं काहीच करु शकत नाही असंदेखील म्हटलं असल्याचं शहजाजने पोलिसांना सांगितलं आहे. पतीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा शहजाजचा आरोप आहे.

पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून तपास सुरु आहे. तपासादरम्यान शहनाज आणि फखरुद्दीनच्या लग्नाला आठ वर्ष झाली असल्याची माहिती मिळाली. लग्नानंतर काही दिवसांतच फखरुद्दीनने हुंड्यासाठी आपला छळ करण्यास सुरुवात केली होती असं शहनाजचा आरोप आहे. आपल्यावर शारिरीक अत्याचार करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केली आहे. पोलिसांनी फखरुद्दीनला अटक करण्यासाठी दोन पथकं तयार केली आहेत. लवकरच त्याला अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.