उत्तर प्रदेशात महिला सुरक्षित असल्याचा दावा अखिलेश यादव यांचे सरकार करत असताना राजधानी लखनऊमध्ये बंगळुरुसारखी घटना घडल्याचे समोर आले आहे. एका दैनिकात काम करणाऱ्या महिला पत्रकाराची गुंडांनी छेड काढल्याची घटना घडली आहे. पीडित महिला सोमवारी रात्री उशिरा कार्यालयातून घरी परतत होती. त्याचवेळी कारमधून आलेल्या गुंडांनी अलीगंज या वर्दळीच्या ठिकाणी तिची छेड काढली. पत्रकार महिलेने विरोध केल्यानंतर तिला बेदम मारहाणही केली. विशेष म्हणजे, पीडितेने १०० या हेल्पलाईन क्रमांकावर उत्तर प्रदेश पोलिसांची मदत मागितली, मात्र, तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे सांगण्यात येत आहे.

कार्यालयातून घरी परतत असताना अलीगंज परिसरात पीडित महिला पत्रकाराची कार गुंडांनी थांबवली. तिची छेड काढली. समाजमाध्यमांतून ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजली. पोलिसांनी तातडीने पावले उचलत घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत महिलेची छेड काढणाऱ्या गुंडांचा शोध घेण्यात येत होता; मात्र ते सापडले नाहीत.

वृत्तानुसार, एका दैनिकात काम करत असलेली महिला पत्रकार सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास कारमधून अलीगंज सेक्टर बीमधील आपल्या घरी जात होती. निशातगंज पुलाजवळ एका कारमधील गुंडांनी तिचा पाठलाग केला. त्याचवेळी ते वारंवार हॉर्न वाजवत होते. गुंडांच्या या वर्तनाकडे पत्रकार महिलेने दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतरही त्यांनी तिचा पाठलाग सुरुच ठेवला. गुंडांनी तिच्या कारचा पाठलाग करून रोखली. पीडितेने आपल्या जवळील मोबाईल फोन बाहेर काढून रेकॉर्डींग करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी गुंडांनी तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. पीडितेने आरडाओरडा सुरू केल्यानंतर गुंडांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि पसार झाले. त्यानंतर महिला पत्रकाराने पोलिसांची मदत मागण्यासाठी १०० क्रमांकावर फोन केला. मात्र, त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत तिने आपल्या कार्यालयातील सहकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर अलीगज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलेची छेड काढणाऱ्या गुंडांचा शोध घेतला असता, ते सापडले नाहीत. कारच्या क्रमांकावरून माहिती घेतली असता, ती कार जिल्हा कार्यालयात कार्यरत असलेल्या जयप्रकाश सिंह यांच्या पत्नीच्या नावे असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात व्यक्तिंविरोधात अलीगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.