उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचं सरकार आल्यापासून संपूर्ण राज्यात रंग बदलण्याची जणू मोहिमच सुरू झालीये. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा रंग बदलला, काही इमारतींचा, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा आणि खुर्चीचाही रंग बदलला, एसटी बसचा, टोलनाक्याचा व काही प्राथमिक शाळांचाही रंग बदलला, इतकंच काय तर शौचालयाचाही रंग बदलण्यात आल्याच्या बातम्या आल्या. आता याच पंक्तीत पोलीस वसाहतींचाही समावेष झाला आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या घरांना भगवा रंग देण्यात आला आहे. मुजफ्फरनगरच्या पोलीस लाइनमध्ये शेकडो घरं पोलिसांसाठी बांधण्यात आली असून सर्व घरांना भगवा रंग दिला आहे. केवळ पोलीस वसाहतीच नाही तर येथे बांधण्यात आलेलं ‘परिवार कल्याण कार्यालय ही भगव्या रंगात रंगवण्यात आलं आहे.

काही महिन्यांपूर्वी आदित्यनाथ यांच्या हरदोई येथील दौऱ्यादरम्यान टॉयलेटच्या टाइल्सलाही भगवा रंग देण्यात आला होता. या प्रकरणावरुन राजकारण तापल्यानंतर टाइल्स हटवण्यात आल्या. तर यापूर्वी उत्तर प्रदेश राज्य हज समितीच्या अर्थात हज हाऊसच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीला देण्यात आलेला भगवा रंग २४ तासांतच उतरवण्याची वेळ योगी सरकारवर आली होती. या प्रकरणी मुस्लिम संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींनी टीकेचा भडिमार केल्यानंतर सरकारने पुन्हा या भिंती पांढऱ्या रंगात रंगवल्या.