उत्तर प्रदेश सरकारने लॉकडाउन हटवण्यास सुरुवात केली असून १ जूनपासून ६०० पैकी कमी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊ, नोएडा, गाजियाबादसारखी मोठी शहरं असणारे जिल्हे जिथे अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जास्त आहे तिथे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ६०० पेक्षा कमी अॅक्टिव्ह रुग्ण कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सोमवारी ते शुक्रवार बाजारपेठा सकाळी ७ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहतील. वीकेण्ड कर्फ्यू मात्र कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीकेण्डला शहर आणि ग्रामीण भागातील बाजारपेठा सॅनिटाइज करण्यात येतील.

राज्य सरकारडून पसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, सर्व दुकान मालक, कर्मचारी आणि ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क या नियमांचं पालन करणं अनिवार्य आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भाजी मार्केट सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी गर्दीची ठिकाणं प्रशासन मोकळ्या जागेत हलवणार आहे.

पहिल्या फळीत काम कऱणारे सरकारी विभाग पूर्ण क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर इतर विभाग ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. खासगी कार्यालयं आणि औद्योगिक कारखान्यांना करोनाच्या नियमांचं पालन करत कामकाज सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. खासगी आस्थापनांना कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास प्रोत्साहित करण्यास सांगितलं आहे.

शाळा, कॉलेज तसंच इतर संस्था बंदच राहणार आहे. प्रशासकीय कामांसाठी ही कार्यालयं सुरु केली जाऊ शकतात असं आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.