उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याची क्रूर थट्टाच केली आहे. दीड लाखाचं कर्ज असलेल्या मथुरा जिल्ह्यातील गोवर्धन तालुक्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी म्हणून फक्त १ पैसा दिला असल्याचा प्रकार समोर आला आहे. छिद्दी असं या शेतकऱ्याचं नाव आहे. जिल्हा प्रशासनाकडून कर्जमाफीचं मिळालेलं प्रमाणपत्र पाहून त्यांना धक्काच बसला.

सरकारनं दिलेल्या कर्जमाफीची रक्कम पाहून धक्काच बसला. त्यावर माझा विश्वासच बसला नाही. अशी कर्जमाफी देऊन या सरकारनं शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे, असं छेद्दी यांनी म्हटलं आहे. ही बँकेकडून झालेली चूक आहे की आणखी काही, याबाबत काहीही माहिती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सहा वर्षांपूर्वी किसान क्रेडिटद्वारे दीड लाखाचं पीककर्ज घेतलं होतं. इतरांनीही कर्ज घेतलं होतं, पण त्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हे सरकार आणि अधिकारी भ्रष्टाचारी आहेत. त्यांना पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत ते कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांना देणार नाहीत, असा आरोप छेद्दी यांचा मुलगा बनवारी शर्मा यानं केला आहे. तांत्रिक चूक असल्याचा दावा मथुराचे जिल्हाधिकारी अरविंद मलप्पा यांनी केला आहे. ही चूक दुरुस्त करण्यात येईल. छेद्दी यांनी याबाबतची तक्रार केल्यानंतर आम्ही चौकशी केली. छेदी यांची दोन बँक खाती उघडण्यात आली होती. त्यातील एकच खातं आधारशी जोडल्याचं स्पष्ट झालं आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात आधारशी जोडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. छेद्दी यांचं एक बँक खातं आधारशी जोडलेलं नाही. कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात छेद्दी यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.