पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांना दलित बहुल भागात जाऊन तिथे वेळ व्यतीत करण्याच्या सूचना केल्या आहेत. पक्षापासून दलित समाज दूर जाऊ नये हा यामागचा उद्देश आहे. मोदींचा आदेश तात्काळ अंमलात आणणारे उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सुरेश राणा आता यावरून एका वादात अडकले आहेत. राणा हे सोमवारी एका दलिताच्या घरी जेवण करण्यास गेले होते. परंतु, दलित कुटुंबाने केलेल्या स्वयंपाकाऐवजी त्यांनी हॉटेलमधून मागवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतल्याचा आरोप आता केला जात आहे.

राणा आणि भाजपाचे अनेक नेते अलिगढ जिल्ह्यातील लोहगढ येथे राहणारे रजनीश कुमार यांच्या घरी रात्री ११ च्या सुमारास गेले. मंत्री आपल्या घरी येणार आहेत, याची रजनीश यांना काहीच माहिती नव्हती. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने रजनीश यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व काही पुर्वनियोजित पद्धतीने करण्यात आले. मला घरी बसण्यास सांगण्यात आले होते. रात्रीचे जेवण बाहेरून मागवण्यात आले. जेवणात दाल मख्खनी, मटार पनीर, पुलाव, तंदुरी रोटी आणि गुलाब जामून मागवण्यात आले होते. त्याचबरोबर पाणीही बाहेरून आणले होते.

याबाबत जेव्हा राणा यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी हा आरोप फेटाळाला. आपल्याबरोबर त्यावेळी सुमारे १०० लोक आले होते. त्यामुळे जेवण बाहेरून मागवले होते. मी त्यांच्या ड्राँईंग रूममध्ये जेवण केले. रजनीश यांच्या कुटुंबीयांनी बनवलेल्या अन्न पदार्थांसह हलवायाकडूनही स्वयंपाक तयार करण्यात आला होता.

पंतप्रधान मोदींच्या धोरणानुसार गत महिन्यात भाजपाने ग्राम स्वराज अभियानाची सुरूवात केली आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या खासदार, आमदार आणि केंद्रीय मंत्र्यांना ५० टक्क्यांहून अधिक दलित लोकसंख्या असलेल्या भागात किमान एक रात्री घालवण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर कल्याणकारी योजनांची जनतेला माहिती देण्यासही सांगितले होते. गत महिन्यात पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात दलितांचा सरकारवर असलेला संताप दिसून आला होता. त्याचबरोबर भाजपाचे काही दलित नेते आणि इतर दलित नेत्यांनी भाजपाकडून दलितांकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप केला होता.