उत्तराखंड दुर्घटनेतील बळींची संख्या ५१ वर

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात नंदादेवी हिमकडा दुर्घटनेतील आणखी १३ मृतदेह रविवारी सापडल्याने मृतांची संख्या ५१ झाली आहे. चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथे ७ फेब्रुवारीला हिमकडा कोसळल्याने अलकनंदा आणि धौलीगंगा या नद्यांना पूर आला होता. त्यात वीज प्रकल्पावर काम करणारे अनेक मजूर वाहून गेले होते. त्यापैकी आणखी १३ जणांचे मृतदेह तपोवन बोगद्यातील चिखल उपसताना सापडले, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कमांडंट आर. के. तिवारी यांनी दिली. दोन मृतदेहांची ओळख पटली असून ते टिहरी जिल्ह्यातील नरेंद्र नगरचे आहेत, तर दुसरा मृतदेह डेहराडून जिल्ह्यातील काळसी येथील आहे, अशी माहिती चमोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

सहा मृतदेह रैनी येथून तर एक मृतदेह रुद्रप्रयागजवळ आढळला. बोगद्यांमध्ये कुणी जखमी अवस्थेत आढळल्यास तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आले आहे. या दुर्घटनेत एनटीपीसी तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे, तर ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला आहे. बचाव पथके बोगद्याचा बुजलेला भाग उपसत असून त्यात ३० जण अडकून पडल्याचे सांगण्यात आले. अद्यापही जवळपास १५० जण बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.