गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव बुधवारी उत्तराखंड विधानसभेने मंजूर केला. सर्वसहमतीने हा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती आहे. विधानसभेच्या मंजुरीनंतर आता हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. असा प्रस्ताव आणणारे उत्तराखंड देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.

उत्तराखंडच्या पशुपालन मंत्री रेखा आर्य यांनी हा प्रस्ताव मांडला होता. प्रस्ताव सभागृहासमोर ठेवताना, भारत सरकारने गायीला राष्ट्रमाता घोषीत करावं असं रेखा आर्य म्हणाल्या. धार्मिक ग्रंथांमध्येही गायीचा अनेकदा उल्लेख आला आहे. गायीच्या पोटात ३३ कोटी देव वास करत असल्याचं म्हटलं जातं. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा दिल्याने गायींच्या संरक्षणासाठी योग्य पावले उचलता येतील. शिवाय गोहत्याही थांबतील, असं आर्य म्हणाल्या. त्यानंतर या प्रस्तावावर चर्चा झाली आणि चर्चेनंतर विधानसभाध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल यांनी हा प्रस्ताव पास केल्याची घोषणा केली.

यावेळी विरोधीपक्ष नेत्या इंदिरा हृदयेश म्हणाल्या, गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यास आमचा आक्षेप नाही, पण हा दर्जा मिळाल्यानंतर तरी किमान गायीचा अपमान होणार नाही, भूकेने तडफडत फिरणारी गाय कुठे दिसणार नाही याची काळजी घेतली जावी असं त्या म्हणाल्या.