राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीबाबत देशात वाद-विवाद आहेत. पक्षनिधीवरून देशातील विविध सामाजिक संघटनांनी वारंवार आवाज उठवला. त्यातच आता उत्तराखंड भाजपाने आपल्या आमदारांना एक नवा आदेश दिला आहे. डेहराडून येथील प्रदेश कार्यालयात आयोजित बैठकीत आमदारांना सामान्य नागरिकांकडून पक्षासाठी निधी मिळवण्याचा आग्रह करण्यात आला. अद्याप आम्हाला कोणते लक्ष्य देण्यात आलेले नाही, असे एका आमदाराने माध्यमांशी बोलताना सांगितले. पण येत्या २६ जानेवारीपर्यंत आम्ही २५ कोटी रूपयेपर्यंत निधी जमा करू शकतो, असेही त्याने स्पष्ट केले.

दुसरीकडे द्वाराहाट येथील भाजपा आमदार महेश नेगी म्हणाले की, अल्मोडा येथे एक कोटी रूपयांचे लक्ष देण्यात आले आहे. ज्या लोकांना निधी द्यायचा आहे, त्यांचे स्वागत आहे. सामान्य लोकांना पक्षाशी जुळवून घेणे हेच यामागचे लक्ष्य असून जेव्हा ते निधी देतील तेव्हाच ते मनापासून भाजपाशी जोडले जातील, असेही ते म्हणाले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट म्हणाले की, प्रत्येक पक्षाला निधीची आवश्यकता असते. आम्ही नेहमी कार्यकर्त्यांना पक्षासाठी निधी जमा करण्यास सांगत असतो. पण आता आम्ही या मोहिमेत सामान्य लोकांना त्यांच्या इच्छेनुसार निधी देण्याची विनंती करत आहोत.

दरम्यान, विरोधी पक्षांनी भाजपाच्या या मोहिमेवर निशाणा साधला आहे. उत्तराखंड प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष सुर्यकांत धसमनान म्हणाले की, भाजपा लोकांची समस्या ऐकण्याऐवजी निधी जमा करण्यात व्यस्त आहे. ते सर्वजण २५ कोटी किंवा ४९ कोटी जमा करण्याबाबतच विचार करत आहेत. आमदारांना काय पक्ष निधी गोळा करण्यासाठी निवडून दिले आहे की नागरिकांची सेवा करण्यासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.