News Flash

Kumbh Mela 2021: करोना चाचणी घोटाळा मी शपथ घेण्याच्या आधीचा; मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

दोषी आढळणाऱ्यावंर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी सांगितले

करोना चाचणी अहवाल प्रकरणी चौकशी सुरू केली असून दोषींनाही सोडले जाणार नाही असे रावत यांनी म्हटले आहे

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये एप्रिल महिन्यात पार पडलेल्या कुंभमेळ्यामधील करोना चाचण्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. एका बनावट कंपनीला कुंभमेळ्यामधील करोना चाचण्यांचं कंत्राट देण्यात आल्याचं उघड झाल्याने कुंभमेळा आयोजनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. करोना चाचणीच्या चौकशीच्या घोटाळ्याबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वीची ही घटना असल्याचे विधान केले आहे.

करोना चाचणी अहवालासंदर्भातील कारवाईबाबत मुख्यमंत्री रावत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले होते. त्यावर त्यांनी “ही बाब मी मुख्यमंत्री होण्यापूर्वीची आहे, परंतु यात दोषी आढळणाऱ्यावंर कडक कारवाई केली जाईल. या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून दोषींनाही सोडले जाणार नाही”, असे सांगितले. डेहराडून येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या १५० बेड्सच्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कुंभमेळा २०२१: बनावट करोना अहवाल प्रकरणी सरकारचे चौकशीचे आदेश

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहरादूनच्या १५० बेडचे कोविड केअर सेंटर पूर्ण झाले आहे. गुरुवारी मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. करोनाच्या तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. त्यासाठी प्रत्येक स्तरावर विस्तृत तयारी केली जात आहे. या रुग्णालयाची तिसऱ्या लाटेतही मोठी मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

करोना संकटात कुंभमेळा पार पडल्याने टीका झाल्यानंतर अजून एक धक्कादायक माहिती समोर आली होती. उत्तराखंड आरोग्य विभागाने हरिद्धारमध्ये कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी चार लाख चाचणी अहवाल (Test Report) बनावट असल्याचा संशय व्यक्त केला होता. यानंतर करण्यात आलेल्या तपासात एकूण १ लाख चाचणी अहवाल बनावट असून खासगी एनज्सीच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती. याप्रकरणी सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

कुंभमेळा करोना चाचणी घोटाळा : एक लाख चाचण्यांचं कंत्राट मिळालेल्या कंपनीचं अस्तित्व केवळ कागदपत्रांवर

यातील एका प्रकरणात तर एकाच फोन क्रमांकावरुन ५० जणांचं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं होतं. तसेच एकच अँटिजन टेस्ट किट ७०० चाचण्यांसाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली. “पत्ते आणि नावं काल्पनिक आहेत. हरिद्वारमधील ‘घर क्रमांक ५’ मधून ५३० नमुने घेण्यात आले आहेत. एकाच घऱात ५०० लोक राहत असणं शक्य तरी आहे का? काहीजणांनी तर मनाप्रमाणे पत्ते टाकले आहेत. घर क्रमांक ५६, अलिगड; घर क्रमांक ७६, मुंबई असे पत्ते लिहिले आहेत,” अशी माहिती तपासात सहभागी एका अधिकाऱ्याने दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 4:47 pm

Web Title: uttarakhand chief minister tirath singh rawat on fake covid tests scam at kumbh abn 97
Next Stories
1 गौतम अदानी यांचे १.१ अब्ज रुपयांचे नुकसान, आशियातील श्रीमंतांच्या यादीतही घसरण
2 CBSE बोर्डाचा निर्णय….२० जुलैला लागणार १०वी चा निकाल!
3 ….तोपर्यंत गोव्यात पर्यटनाला परवानगी देणार नाही; मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर
Just Now!
X