उत्तराखंडमध्ये हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज तंतोतंत बरोबर ठरला आहे. बुधवार संध्याकाळपासून येथील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाला सुरूवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. चमोली जिल्ह्यातील नारायणबगडमध्ये ढगफुटीमुळे घरं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, अनेक गाड्या वाहून गेल्याचीही माहिती आहे. सुदैवाने अद्याप जीवितहानीबाबत वृत्त नाही. अजूनही येथे पावसाची रिपरिप सुरूच असल्याची माहिती आहे

चमोली जिल्ह्यातील नारायणबगडमध्ये मुसळधार पावसानंतर अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आणि मातीचा ढिगारा वाहून रस्त्यावर आला. परिणामी, कर्णप्रयाग-ग्वालदम हायवे बंद करण्यात आला. तर, रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक गाड्या ढिगा-याखाली गाडल्या गेल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला आणि हायवेवरील वाहतूक सध्या धिम्यागतीने सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. २०१३ मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर चमोली जिल्ह्यातील या ढगफुटीनंतर स्थानक नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

हवामान विभागाने दिला होता इशारा –

पुढील ३६ ते ३८ तासांमध्ये हवामानात मोठा बदल दिसू शकतो. अनेक परिसरात मुसळधार पावसामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. पावसाशिवाय ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवला होता.