उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी सध्या सुरु असलेल्या कुंभमेळ्याची तुलना बंदिस्त ठिकाणी पार पडलेल्या आणि परदेशी नागरिकांनी हजेरी लावलेल्या निजामुद्दीन मरकजसोबत केली जाऊ नये असं म्हटलं आहे. कुंभमेळ्याला हजेरी लावणारे भक्त बाहेरचे नसून आपले लोक आहेत असा युक्तिवाद त्यांनी हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना केला आहे. तसंच कुंभमेळा १२ वर्षांतून एकदा येतो आणि हा लोकांच्या श्रद्धा आणि भावनेचा विषय असल्याचंही ते म्हणाले आहेत. लोकांचं आरोग्य प्राथमिकता आहे, पण श्रद्धेकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

कुंभमेळ्याला अफाट गर्दी….फोटो पाहिलेत का?

तिरथ सिंह रावत यांना कुंभ आणि निजामुद्दीन मरकजची तुलना का केली जाऊ नये असं विचारण्यात आलं होतं. कारण कुंभमेळ्यातही मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात हातभार लावण्याची भीती आहे. यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, “कुंभ आणि मरकजमध्ये कोणतीही तुलना होता कामा नये. मरकजचा कार्यक्रम एका बंदिस्त ठिकाणी पार पडला होता. पण कुंभ एका मोकळ्या ठिकाणी गंगेच्या किनारी पार पडत आहे,” असं तिरथ सिंह रावत यांनी सांगितलं आहे.

कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी; करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन

कुंभमेळा आणि मरकजमधील फरक अधोरेखित करताना तिरथ सिंह रावत यांनी कुंभसाठी हजेरी लावणारे भक्त हे बाहेरचे नसून आपले लोक आहेत असं म्हटलं. “मरकजचा कार्यक्रम पार पडला तेव्हा करोनासंबंधी इतकी जागरुकता नव्हती किंवा कोणतीही नियमावली नव्हती. कार्यक्रमासाठी हजेरी लावणारे किती काळ तिथे वास्तव्यास होते याची कोणालाही कल्पना नाही,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. पण आता करोनाबद्दल जागरुकता असून त्यासंबंधी नियमावलीदेखील आहे असं ते म्हणाले.

तिरथ सिंह रावत यांनी यावेळी कुंभमेळा १२ वर्षातून एकदा पार पडत असून हा लोकांच्या श्रद्धा आणि भावनेशी जोडलेला विषय असल्याचं सांगितलं. “करोना संकटाचं आव्हान असताना सर्व नियमांचं पालन करत यशस्वीपणे कुंभमेळा पार पाडणं आमचं ध्येय आहे,” असं ते म्हणाले आहेत.