उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरीश रावत यांनी राम मंदिरासंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. देशात काँग्रेसचे सरकार आल्यावरच अयोध्येत राम मंदिर होणार, असे विधान त्यांनी केले आहे.

उत्तराखंडमधील पराभवानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा या राज्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर रावत हे उत्तराखंडचा दौरा करत असून रावत हे शुक्रवारी ऋषिकेश येथे पोहोचले. रावत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपावर टीका केली. रावत म्हणाले, मर्यादांचे उल्लंघन करणारे भाजपावाले हे पापी असून जे मर्यादा ओलांडतात ते मर्यादा पुरुषोत्तमाचे (प्रभू श्रीरामाचे) भक्त होऊच शकत नाही. आम्ही मर्यादेचे पालन करणारी लोक आहोत. काँग्रेस जेव्हा सत्तेवर येईल तेव्हा राम मंदिराचे निर्माण केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

उत्तराखंडमध्ये काँग्रेस सरकारच्या काळात सुरु झालेल्या योजना भाजपा जाणीवपूर्वक बंद करत आहे आणि केंद्र सरकारही उत्तराखंडच्या विरोधात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाच्या काळात उत्तराखंडमधील बेरोजगारी वाढत असून आमच्या काळात सुरु झालेल्या योजना बंद झाल्याने जनतेच्या अडचणीत भर पडली आहे, असे त्यांनी सांगितले. रावत यांनी राम मंदिरासंदर्भात विधान केल्याने काँग्रेसनेही हिंदू मतांवर डोळा ठेवून हे विधान केले की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.