उत्तराखंडच्या महिला काँग्रेस नेता महक खान यांना अटक करण्यात आली आहे. बी.टेकचं शिक्षण घेणा-या एका विद्यार्थिनीचं अपहरण केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्याचा आरोप हिंदू संघटनांनी त्यांच्यावर केला आहे. महक खान या उत्तराखंड महिला काँग्रेस सचिव आहेत. मुलाचं लग्न लावून देण्यासाठी संबंधित विद्यार्थिनीचं अपहरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. महक खान यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्दानी येथून अभियांत्रिकेची विद्यार्थिनी 18 एप्रिलपासून गायब होती. कुटुंबियांनी महक खान आणि त्यांचा मुलगा दानिश यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रकरणाच्या तपासाला सुरूवात झाली. तरुणीसोबत शिकणा-या तिच्या मैत्रिकणींकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी महक खान या मुलगा दानिश याच्यासोबत भीमताल येथे आल्या होत्या, आणि त्यावेळी धमकावून त्या तरुणीला घेऊन गेल्या असं सांगितलं. यानंतर विद्यार्थिनिला बळजबरी पळवल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी महक खान आणि त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यापासून हिंदू संघटनांकडून महक खान यांच्यावर ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 22, 2018 1:35 pm