योग्य उत्तर देणाऱ्या शिक्षिकेचा अपमान

उत्तराखंडचे शिक्षणमंत्री अरविंद पांडे यांनी एका सरकारी शाळेत मांडलेल्या अंकगणिताच्या अजब सिद्धान्तामुळे गणित आणि रसायनशास्त्राचे नियमच उलटे झाले आहेत.

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री असलेल्या पांडे यांनी डेहराडूनच्या महिला इंटर कॉलेजला सोमवारी अचानक भेट दिली. एक शिक्षिका विज्ञान शिकवत असलेल्या वर्गात पांडे गेले. सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा काय आहे याची तपासणी करण्याचा मोह पांडे यांना आवरला नाही, त्यांनी सदर शिक्षिकेला एक-दोन प्रश्न विचारण्याचे ठरविले. खडू आणि फळा पुसण्याचे डस्टर घेऊन पांडे तडक फळ्याकडे गेले आणि त्यांनी (उणे) अधिक (उणे) बरोबर काय, असे फळ्यावर लिहिले. शिक्षिकेने उत्तर (उणे) असल्याचे सांगितले. परंतु मंत्रीमहोदय ते मान्य करण्यास तयार नव्हते आणि त्यांनी आपल्या प्रश्नाचे उत्तर (अधिक) असल्याचा दावा केला आणि आपणही विज्ञान शिकलो असल्याची पुस्ती जोडली.

पांडे यांच्या मतानुसार, गणितामध्ये (उणे) अधिक (उणे) बरोबर (अधिक) परंतु रसायनशास्त्रानुसार (उणे) असा सिद्धान्त त्यांनी स्वत:च मांडला. मंत्र्यांसमवेत असलेल्या एका अधिकाऱ्याला त्यांची चूक लक्षात आली तरीही अधिकारी शांतच राहिला. शिक्षिकेने दिलेल्या योग्य प्रतिसादाबद्दल पांडे यांना सोयरसुतक नव्हते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपलेच म्हणणे रेटण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर वर्गातून बाहेर पडताना त्यांनी शिक्षिकेला तुम्ही महिला असल्याने तुम्हाला माफ करतो असे बजावले.

पांडे यांची मुक्ताफळे समाज माध्यमांवर व्हायरल झाली तेव्हा पांडे यांनी आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही शिक्षकाचा अनादर करण्याचा आपला हेतू नव्हता. केवळ शिक्षकच नव्हे तर एकाही विद्यार्थ्यांजवळ कोणतेही पुस्तक नव्हते. आपल्याला मंत्रिपदाची हाव नाही, आपण चूक असल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले.