उत्तराखंडातील प्रलयंकारी संकटामुळे हजारभर लोकांना प्राण गमवावे लागले असून खराब हवामानाची तमा न बाळगता शनिवारी सुमारे १० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अजूनही सुमारे २२ हजार लोक ठिकठिकाणी अडकून पडले असून त्यांच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न सुरू असल्याची माहिती उत्तराखंड तसेच केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत ७० हजार लोकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. रविवारपासून पुढचे तीन दिवस खराब हवामानाचे असतील आणि या काळात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे उत्पन्न होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, उत्तराखंडातील या भीषण आपत्तीचा गैरफायदा घेऊन काही ठिकाणी यात्रेकरू व स्थानिकांना लुटण्याचेही प्रकार सुरू झाले आहेत. उत्तराखंडमधील समस्येवरून राजकीय आघाडीवरही आता आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली असून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. केदारनाथ मंदिर परिसरात १२३ जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी ८३ जणांचे मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले. या परिसरातील चिखलमाती दूर हटविल्यानंतर आणखीही मृतदेह सापडण्याची भीती आहे. आतापर्यंत एकूण मृतांची एकूण संख्या ६८० झाली असून ही संख्या हजाराच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. केदारनाथ शहराची अत्यंत भयाण अवस्था झाली आहे. केदारनाथच्या वाटेवरील रामबारा आणि जंगलचट्टी भागात अजूनही हजारभर यात्रेकरू अडकले आहेत. जंगलचट्टी हा भाग सर्वाधिक चिंतेचा ठरला आहे. तेथे अद्यापही ४०० ते ५०० यात्रेकरू अडकले असण्याची भीती आहे. नैसर्गिक प्रकोपाच्या तडाख्यात ठिकठिकाणी सापडलेल्या असंख्य यात्रेकरूंना तसेच स्थानिक लोकांना या कोपाबरोबरच मानवी लूटमारीचाही मुकाबला करावा लागत आहे. असंख्य अडचणींच्या फेऱ्यात सापडलेल्या या लोकांना सध्या एका पराठय़ासाठी २५० रुपये तर बटाटा चिप्सच्या छोटय़ा पाकिटासाठी १०० रुपये मोजावे लागत आहेत. भाताच्या छोटय़ा वाडग्यासाठी ४० रुपये मोजावे लागल्याची माहिती येथील ५६ वर्षांचे रहिवासी मनोहरलाल यांनी दिली. आपल्याबरोबरच येथे आलेल्या अनेक यात्रेकरूंचीही अशीच आर्थिक पिळवणूक हॉटेलचालक व व्यापाऱ्यांकडून होत असल्याचे बघून अतिशय दु:ख झाल्याचे त्यांनी सांगितले. अन्य रहिवासी मौर्य यांची टॅक्सी पुराच्या पाण्यात वाहून गेली असून आपल्यालाही अन्यत्र कोठेही अन्नपाणी न मिळाल्यामुळे भाताच्या एका वाडग्यासाठी ४० रुपये भरावे लागल्याचे ते म्हणाले. पिण्याच्या पाण्याच्या दोन बाटल्या आणि बटाटा चिप्सच्या लहान पाकिटासाठी ४०० रुपये मोजल्याचे बागपत येथील अमित गुप्ता यांना गौमुख येथे अडकलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. टॅक्सीच्या ज्या प्रवासासाठी हजारभर रुपये लागतात त्याच प्रवासाला आता टॅक्सीचालक तीन ते चार हजार रुपये मागत असल्याची तक्रार एका शीख भाविकाने केली. दुकानदार पराठय़ासाठी २५० रुपये तर पाण्याच्या बाटलीसाठी २०० रुपये मागत असल्याचे रेल्वे स्थानकावर खोळंबून असलेल्या एका असहाय प्रवाशाने सांगितले. या यात्रेकरूंना चोरीचाही सामना करावा लागत आहे. नेपाळी युवकांनी माझ्याकडील सुमारे २५ हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार एका यात्रेकरूने गौरीकुंड येथे केली तर एका चोरटय़ाने चाकूचा धाक दाखवून आपले दागिने चोरले, असे एका महिलेने सांगितले. सुशीलकुमार शिंदे यांची कबुली सरकारी संस्थांमधील समन्वयाच्या अभावामुळे उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे फटका बसलेल्यांसाठी सुरू असलेले मदतकार्य योग्य प्रकारे होत नसल्याची कबुली केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. उत्तराखंडमधील मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी शिंदे येथे आले असता त्यांनी सांगितले, की अडकून पडलेल्या भाविकांना सोडवण्यासाठी गौरीकुंड ते केदारनाथ व पादुकेश्वर ते बद्रिनाथ असे पायवाटेचे पूल तयार केले जात आहेत. अनेक ठिकाणी सापडलेले मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असून त्यांची ओळख पटवणे कठीण आहे. त्यामुळे मृतांचे डीएनए संवर्धित केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. शिंदे यांच्या वक्तव्यावर भाजपची टीका सुशीलकुमार शिंदे यांनी, योग्य संपर्क यंत्रणेच्या अभावामुळे उत्तराखंडमधील मदतकार्यात अडथळे आल्यासंबंधी केलेल्या वक्तव्याचा भाजपने तीव्र निषेध केला आहे. केंद्र आणि उत्तराखंडमध्येही काँग्रेसची सत्ता असतानाही शिंदे यांनी असे मत मांडावे हे दुर्दैवी असून आता दोष तरी कोणास द्यावा, अशी विचारणा भाजपने केली. पक्षाचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. उत्तराखंडात अशी भीषण परिस्थिती निर्माण झालेली असताना चांगला समन्वय निर्माण करण्यासाठी पावले उचलण्याऐवजी केंद्र सरकार राज्य सरकारवरच दोषारोपण करीत आहे, अशी टीका नक्वी यांनी केली. सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी परदेशातील १७ पर्यटकांची सुटका केली असून केदारनाथ ते गौरीकुंड या पट्टय़ातील किमान एक हजार पर्यटकांपर्यंत पोहोचण्याची तयारीही सुरक्षा रक्षकांनी केली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून अन्नपाणी न मिळाल्याने त्यांपैकी काही जण आजारी पडले आहेत. हवामान प्रतिकूल असले तरी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने अडकलेल्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तराखंडला बसलेल्या प्रलयकारी पुराच्या तडाख्यामुळे भाजपने आपले प्रस्तावित देशव्यापी जेल भरो आंदोलन पुढे ढकलले आहे. प्रस्तावित आंदोलनाकडे लक्ष देण्यापेक्षा सध्या उत्तराखंडमधील पूरग्रस्तांच्या मदतकार्यावर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. उत्तराखंडमधील आपत्ती ही राष्ट्रीय शोकांतिका म्हणून जाहीर न करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असेही आवाहन राजनाथ सिंग यांनी केले. भाजपचे आंदोलन लांबणीवर उत्तराखंडला बसलेल्या प्रलयकारी पुराच्या तडाख्यामुळे भाजपने आपले प्रस्तावित देशव्यापी जेल भरो आंदोलन पुन्हा पुढे ढकलले आहे. छत्तीसगढमध्ये नक्षलवादी हल्ल्यात काँग्रेसचे अनेक नेते ठार झाले, त्यानंतर भाजपने आपले आंदोलन पुढे ढकलले होते. प्रस्तावित आंदोलनाकडे लक्ष देण्यापेक्षा सध्या उत्तराखंडमधील पूरग्रस्तांच्या मदतकार्यावर आपले लक्ष केंद्रित करा, अशा सूचना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी देशभरातील पक्ष कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्ती ही राष्ट्रीय शोकांतिका म्हणून जाहीर न करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन राजनाथ सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना केले आहे. महापुराच्या तडाख्यामुळे ज्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे ते पाहता ही राष्ट्रीय आपत्ती आहे, असे भाजपला वाटते. त्यामुळे देशभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतकार्याकडे लक्ष द्यावे, असे राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. उत्तराखंडात पुन्हा जोरदार वृष्टी? उत्तराखंडमधील स्थिती नियंत्रणाखाली येण्यापूर्वीच पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांच्या सुटकेसाठी लष्कराने प्रयत्नांचा वेग वाढविला आहे. मदतकार्य जवानांची संख्या सहा हजारांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे लष्करप्रमुख जन. विक्रमसिंग यांनी सांगितले. या भागातील अनेक ठिकाणी कोणीही पोहोचू शकलेले नाहीत. तेथे काहीजण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. परदेशी पर्यटकांची सुटका सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी परदेशातील १७ पर्यटकांची सुटका केली असून केदारनाथ ते गौरीकुंड या पट्टय़ातील किमान एक हजार पर्यटकांपर्यंत पोहोचण्याची तयारीही सुरक्षा रक्षकांनी केली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून अन्नपाणी न मिळाल्याने त्यांपैकी काही जण आजारी पडले आहेत. हवामान प्रतिकूल असले तरी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने अडकलेल्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील पर्यटकांना महाराष्ट्र सदनात आसर पुणे जिल्ह्य़ातील लोणी धामणीतील पर्यटक उत्तराखंडमधील गोविंद घाटीत अडकले होते. तर विदर्भातील पर्यटकही विविध ठिकाणी अडकले होते. मात्र या सर्वाची सुखरूप सुटका करण्यात आली आणि त्यांना महाराष्ट्र सदनात आसरा देण्यात आला. सदनातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रात्री चहापान, भोजनाची व्यवस्था केली. इतकेच नव्हे तर डॉक्टरांना पाचारण करून वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. सदनाच्या परिसरात निवारण कक्ष रातोरात उभारण्यात आले असून शुक्रवारी मध्यरात्री पुणे परिसरातील यात्रेकरूंचा पहिला जथा तेथे दाखल झाला. ४० हेलिकॉप्टर्स, ३० बसेस तैनात अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी सध्या ४० हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली असून राजस्थान सरकारने दोन हेलिकॉप्टर आणि ३० बसगाडय़ा मदतीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. याखेरीज मदत न मिळालेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांनी केले आहे.