उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील नंदादेवी हिमकड्याचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. बचावकार्यात अनेक संस्था सहभागी झाल्या असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने सध्या संपूर्ण दुर्घटनेचा अभ्यास केला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिली आहे. दुर्घटनाग्रस्तांना अन्न आणि इतर मदत पुरवणं सध्या आपली प्राथमिकता असल्याचं ते म्हणाले आहेत.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, “हिमकड्याचा भाग कोसळल्यानेच ही दुर्घटना झाल्याचं सध्या दिसत आहे. मुख्य सचिवांना कारणं शोधण्याचा आदेश देण्यात आला आहे”. प्राथमिक अंदाजानुसार, सध्याच्या घडीला २०० लोक बेपत्ता आहेत. आतापर्यंत ११ मृतदेह सापडले आहेत.

उत्तराखंडमध्ये प्रलय

“दुर्घटनेचं कारण शोधण्यासाटी डीआरडीओचं एक पथक कारणाचा शोध घेत असून आम्ही इस्रोचे संसोधक आणि तज्ञांचीदेखील मदत घेणार आहोत,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दुर्घटनेच्या प्रमुख कारणांचं व्यापक विश्लेषण करण्यात आल्यानंतर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आम्ह योजना तयार करु असंही त्यांनी सांगितलं आहे.

बचावकार्य सध्या वेगाने सुरु असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितलं की, “आरोग्य सुविधांसोबतच बचवाकार्यासाठी गरज असणारी सर्व तयारी करण्यात आलेली आहे. दुर्घटनाग्रस्त गावांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न सुरु आहे”. “आर्थिक नुकसान किती झालं आहे याचा आढावा घेताना जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवणं आपली प्राथमिकता,” असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.