उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून आलेल्या जलप्रलयातील भयानक छायाचित्रे आता समोर आली आहेत. दरम्यान, येथील तपोवन बोगद्यातून बचावलेल्या कामगारांनी आपल्यावर ओढवलेल्या कठीण प्रसंगाचे कथन केले आहे. बोगद्यात बर्फाचं पाणी आणि राडारोडा वेगानं पसरत असताना त्यांनी आतमध्ये कसा तग धरला हे त्यांनी सांगितलं.

तपोवन बोगद्यातून सुखरुप बाहेर आलेल्या २६ वर्षीय बसंत बहादूर यांनी सांगितलं की, “तपोवन बोगद्यासाठी ते तीन वर्षांपासून काम करत आहेत. रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून आमच्या कामाला सुरुवात झाली. सकाळी १०.३० मिनिटांनी त्यांनी मोठ्ठा आवाज ऐकला. मात्र, आम्हाला बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही कारण बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पाणी आणि राडारोडा वेगाने आतमध्ये पसरला होता. मात्र, बोगद्यात एक छोटासं छिद्र होतं जिथून उजेड आतमध्ये येत होता. बोगद्यात साधारणपणे मोबाईलचं नेटवर्क येत नाही. पण रविवारी ही दुर्घटना झाल्यानंतर आणि आम्ही आतमध्ये अडकलेलो असताना अचानक २ मिनिटांसाठी मोबईलला नेटवर्क आलं. याच काळात आम्ही आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यानंतर दोन-तीन तासांत बचाव पथक आमच्यापर्यंत पोहोचलं. त्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने आम्हाला तिथून बाहेर काढलं गेलं.

आणखी वाचा- इस्रो शोधणार उत्तराखंडमधील प्रलयाचं नेमकं कारण; २०० लोक अद्यापही बेपत्ता

५० वर्षीय के. श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितलं की, ‘दोन दिवस पाऊस आणि हिमवृष्टीनंतर रविवारी वातावरण स्वच्छ होतं, असं वाटतं नव्हतं की मोठा पाऊस झाला आहे. आम्हाला वाटलंही नव्हतं की इतकं मोठ संकट येणार आहे. दरम्यान, आम्हाला ऐकू येत होतं की काही लोक आम्हाला आवाज देत आहेत आणि बोगद्यातून बाहेर येण्यासाठी सांगत आहेत. आम्ही सर्वांनी पळत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पाणी आणि राडारोडा आत शिरला होता आणि आम्ही सर्वजण बोगद्यात अडकून पडलो होतो”

आणखी वाचा- बोगद्यातील छिद्र आणि मोबाइल फोन ठरला ‘त्या’ १६ मजुरांसाठी तारणहार

जोशीमठमधील आयटीबीपी रुग्णालयात उपचार घेत असलेले आंध्र प्रदेशचे श्रीसायलम येथील रहिवासी असलेले रेड्डी म्हणाले की, “बोगद्यात आम्ही लोखंडी बारला पकडून बराच वेळ लटकून राहिलो. या बोगद्यामध्ये काम करणारे बहुतेक मजूर हे नेपाळचे आहेत. बोगद्यात अडकल्यानंतर आम्ही सर्वजण मदत पोहोचण्याची वाट पाहत होतो. आम्ही आतमध्ये केवळ याच कारणामुळे जिवंत राहू शकलो कारण आतल्या लोखंडी बारला आम्ही लटकलो होतो. हा बोगदा तीन मीटर रुंद आणि सहा मीटर उंच आहे. घटनेनंतर लवकरच त्यात पाणी भरायला सुरुवात झाली हे बर्फाचं पाणी होतं आणि खूपच थंड होतं. हे पाणी आमच्यापासून केवळ एक मीटर खाली होतं. त्यामुळे आम्ही लटकून राहण्याशिवाय काहीही करु शकत नव्हतो.