केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचीच परीक्षा पाहणारी उत्तराखंड विधानसभेतील बहुचर्चित शक्तिपरीक्षा मंगळवारी पूर्ण झाली. या शक्तिपरीक्षेचा निकाल बंद लिफाफ्यामध्ये बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येईल. शक्तिपरीक्षेत काय निकाल लागतो, यावरच उत्तराखंडमधील हरिश रावत यांचे सरकार तरणार की त्याला तिलांजली मिळणार हे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट होईल. मात्र, राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री पद गमावलेले हरिश रावत यांनी उद्या सर्वोच्च न्यायालयात उत्तराखंडमधील जनतेचाच विजय होईल, असे शक्तिपरीक्षेनंतर पत्रकारांना सांगितले. सभागृहात काय झाले याबद्दल मी बोलणार नाही. पण अनिश्चिततेचे ढग उद्या नक्कीच दूर होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. बहुमत चाचणीसाठी मंगळवारी सकाळी उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट तात्पुरती उठविण्यात आली होती.
बहुमत चाचणीसाठी येणाऱ्या काँग्रेस आमदारांचे मंगळवारी सकाळी रावत यांनी विधानसभेच्या प्रवेशद्वारावरच हसत हसत स्वागत केले. तर दुसरीकडे भाजपचे नेते भीमलाल आर्य हे थोडे उशीरानेच विधान भवन परिसरात दाखल झाले. या शक्तिपरीक्षेवेळी सर्वांचे लक्ष बहुजन समाज पक्षाच्या दोन आमदारांकडे होते. बसपचे आमदार काँग्रेसलाच पाठिंबा देतील, असे बसप अध्यक्ष मायावती यांनी मंगळवारी सकाळी नवी दिल्लीमध्ये स्पष्ट केले. भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी सांगितले. हरिदास आणि सरवर करीम अन्सारी या बसपच्या दोन्ही आमदारांनी काँग्रेसच्याच पारड्यात मत टाकणार असल्याचे स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसपासून दूर असलेल्या पक्षाच्या आमदार रेखा आर्य या बहुमत चाचणीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांच्यासोबत विधानभवनात आल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. रेखा आर्य यांनी यावेळी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
बहुमत चाचणीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडे दिल्यानंतर बुधवारी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार असून, त्यावेळीच तेथील राष्ट्रपती राजवट उठवली जाणार की कायम राहणार हे निश्चित होईल.