पंतप्रधान कार्यालयाचे मदतीचे आश्वासन
उत्तराखंडच्या वनक्षेत्रात फेब्रुवारी महिन्यापासून पेटलेला वणवा अद्याप शमला नसल्याने भारतीय हवाई दलाने शनिवारी एमआय-१७ विमाने तैनात केली असून पंतप्रधान कार्यालयानेही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
फेब्रुवारी महिन्यात हा वणवा पसरला असून आतापर्यंत आगीच्या ९२२ घटना घडल्या असून त्यामध्ये सहा जण मृत्युमुखी पडले आहेत, तर सात जण जखमी झाले आहेत. या वणव्यात आतापर्यंत जवळपास १९०० हेक्टर वनक्षेत्र खाक झाले आहे.
उत्तराखंडमधील वनक्षेत्रात पसरलेला वणवा शमविण्यासाठी भारतीय हवाई दलाने ११ कर्मचारी असलेली एमआय-१७ ही विमाने तैनात केली आहेत. पंतप्रधान कार्यालयाने राज्य सरकारकडून या बाबतचा अहवाल मागविला असून सर्व प्रकारे मदतीचे आश्वासन दिले आहे.
राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) १३५ कर्मचाऱ्यांची तीन पथके वणवा शमविण्याच्या कामसाठी तैनात करण्यात आली असून त्यांनी काम सुरू केले आहे, असे एनडीआरएफच्या महासंचालकांनी सांगितले. अलमोरा, पौरी, गौचर येथे पाण्याचे टँकर, फ्लोटिंग पंप, वैद्यकीय सुविधा तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी उत्तराखंडचे राज्यपाल के. के. पॉल यांच्याशी चर्चा केली असून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत मिळेल, असे आश्वासनही दिले आहे.
रुद्रप्रयाग वनविभागाने वणव्याचा मुकाबला करण्यासाठी लष्कराची मदत घेतली असून विशेषत: महामार्गानजीक काम सुरू आहे. चामोली, पौरी, रुद्रप्रयाग, टेहरी, उत्तरकाशी, पिठोरगड, अलमोरा आणि नैनिताल आदी जिल्हे सर्वाधिक बाधित झाले आहेत.