उत्तराखंडमध्ये जूनमध्ये आलेल्या महाप्रलायामुळे अनेक नागरिकांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. त्यामध्ये अजून ६८ जणांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी केदारनाथच्या खो-यांमध्ये हे ६८ मृतदेह सापडले आहेत.
केदारनाथ येथील गरुचट्टी आणि गौरीकुंड येथे हे मृतदेह आढळून आल्याचे पोलीस महासंचालक आर.एस.मीना यांनी सांगितले आहे. या मृतदेहांचा डीएनए नमूना, पंचनामा आणि आवश्यक परिक्षणानंतर त्यांच्या अंगावरील बांगड्या, कानातील रिंग आणि काही वस्तूही ओळख पटविण्यासाठी घेण्यात आल्या आहेत. तरी अद्याप केदारनाथजवळ शोधकार्य अजूनही सुरु आहे. यापूर्वी, मंगळवारी १६६ जणांचे मृतदेह सापडले असून त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मागील दोन टप्प्यात २०० जणांचे मृतदेह सापडले असून या दुर्घटनेतील मृत पावलेल्या नागरिकांची संख्या एक हजारच्या वर गेली आहे.  
बेपत्ता असलेल्या पर्यटकांना शोधण्याची मोहिम रविवारपर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे. गिर्यारोहक आणि पोलीस दलातील जवानांकडून ही मोहिम राबविण्यात येत असून, सुमारे १३००० फूट उंचीपर्यंत जाऊन पर्यटकांचा शोध घेण्यात येत आहे.