उत्तराखंडात गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना आलेले महापूर आणि अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने राज्यातील मृतांची संख्या ५५० च्याही पुढे गेली असून अनेक भागांमध्ये अडकलेल्या ५० हजारांहून अधिक लोकांच्या सुटकेसाठी बचाव पथकाने अथक प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.
दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यंत उत्तरांचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यामुळे डोंगराळ भागात अडकून पडलेल्या लोकांच्या बचावकार्यात मोठे अडथळे येण्याची शक्यता आहे. रविवारी सायंकाळी हिमालयाच्या पश्चिम भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून सोमवार, २६ जून रोजी त्याची तीव्रता आणखी वाढण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
 मातीच्या ढिगाऱ्यांखालून ५५६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी दिली. याखेरीज ढिगाऱ्याखाली आणखीही मृतदेह अडकले असण्याची भीती बहुगुणा यांनी व्यक्त केली. हिमालयाच्या इतिहासातील ही सर्वात भीषण आपत्ती असल्याची शक्यता वर्तवून संकटग्रस्त भागाच्या पुनर्वसनास किमान १५ दिवस लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सूचित केले. हरिद्वारजवळ गंगा नदीच्या किनाऱ्यावर शुक्रवारी ४० जणांचे मृतदेह सापडले. केदारनाथ व बद्रीनाथ येथे हजारो लोक अडकून पडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या भाविकांच्या सुटकेसाठी आणखी ४० हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. मदतकार्यासाठी २५० भाविक अडकलेल्या केदारनाथ क्षेत्रावर प्रथम लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यानंतर नऊ हजार भाविक अडकलेल्या बद्रीनाथकडे धाव घेतली जाणार आहे. उत्तराखंडचे कृषीमंत्री हरक सिंग रावत यांनी शुक्रवारी केदारनाथची पाहणी केली. ते म्हणाले की, केदारनाथचे या आपत्तीत सर्वाधिक नुकसान झाले असून तेथील स्थिती पूर्ववत व्हायला पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. . उत्तराखंडमध्ये राजस्थानचे दोन हजार लोक अडकले असून त्यांच्या आप्तांसाठी सरकारने चार मदतकक्ष स्थापन केले आहेत.  हिमाचल प्रदेशात किनौर जिल्ह्य़ात मदतकार्य वेगात आहे. पूह, नाको आणि काझा भागांतही अनेक लोक अडकल्याची भीती असून तेथे शोध सुरू आहे.

‘केसरी मेरीगोल्ड’चे आवाहन
‘केसरी मेरीगोल्ड’ तर्फे आयोजित चार धाम यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांच्या सोयीसाठी ‘केसरी’च्या ‘आपल्या माणसा’समवेत ही मंडळी सुरक्षित असल्याचे संचालकांनी कळविले आहे. चार गटापैकी एका गटातील मंडळींना अडचणींचा सामना करावा लागत असला तरी त्यांनाही कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू असून संबंधितांच्या नातेवाईकांनी केसरी कार्यालयात ९१६७७७४९७० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा

उत्तराखंडमध्ये १७ नाशिककर बेपत्ता
खास प्रतिनिधी, नाशिक : उत्तराखंडमध्ये नाशिकमधील १७ भाविक अद्याप बेपत्ता असून  वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या भाविकांची विस्तृत माहिती उत्तराखंड सरकारला देण्यात आली आहे.  बद्रीनाथ येथील भोलागिरी मठात नाशिकमधील सोमनाथ तापडे (६८), सुशीला तापडे (५७), खुशी तापडे (०९), प्रिया तापडे (२७), हर्षल तापडे (०६), बशी तोष्णीवाल (३९), वैशाली तोष्णीवाल (१२), स्वर तोष्णीवाल (०८), हरीश केला (३७), अर्चना केला (०९), प्रवीण जाजू (३४), वृषाली जाजू (३१), सायीश जाजू (०२), जगदिश नागोरी (३३), अनुराथा नागोरी (२९) सर्वेश नागोरी (०४), पूजा चांडक (१९) यांचा शोध  लागलेला नाही.

सोनिया गांधी यांचा आदेश
नवी दिल्ली : उत्तराखंडतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन द्यावे, असा आदेश काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिला आहे.लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांना खासदार निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचे आदेशही सोनिया गांधी यांनी दिले आहेत. लोकसभेत काँग्रेसचे २०३ तर राज्यसभेत ७२ सदस्य आहेत.