पिथौरागढ : उत्तराखंडमध्ये पिथौरागढ जिल्ह्य़ाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक पथक अलीकडेच येथील एका आदिवासी खेडय़ातील लोकांची कोविड-१९ ची चाचणी करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी हे लोक जवळच्या जंगलात पळून गेले.

कुटा चौरानी हे खेडे बनरावत या लुप्तप्राय होत चाललेल्या जमातीच्या लोकांचे निवासस्थान आहे.

कोविड चाचणी पथक शुक्रवारी आपल्या खेडय़ात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे आदिवासी लगतच्या जंगलात पळून गेले, असे डीडीहाटचे उपविभागीय दंडाधिकारी के.एन. गोस्वामी यांनी रविवारी सांगितले. बनरावत समुदायाला केंद्र सरकारने १९६७ साली ‘लुप्त होण्याच्या बेतात असलेली आदिम जमात’ जाहीर केले होते.

‘या जमातीचे ५०० सदस्य डीडीहाट उपविभागातील ८ वस्त्यांमध्ये राहात आहेत.  करोना चाचणी पथके आम्ही औलतारी, जमतारी व कुटा चौरानी खेडय़ांमध्ये पाठवली होती. औलतारी व जमतारी खेडय़ांतील १९१ रहिवासी चाचणीस तयार झाले, मात्र  कुटा चौरानी खेडय़ाच्या रहिवाशांनी जंगलात पलायन केले’, असे गोस्वामी यांनी सांगितले.

स्वॅब स्ट्रीपची भीती

करोना चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पट्टीमुळे (स्वॅब स्ट्रीप) आपल्याला संसर्ग होईल अशी गावकऱ्यांना भीती वाटत होती, असे गोस्वामी म्हणाले. ‘आम्ही आरोग्य तपासणीसाठी आणि औषधे घेण्यासाठी तयार आहोत, मात्र ही पट्टी शरीरात शिरू देणे आम्हाला मान्य नाही’, असे कुटा चौरानी खेडय़ातील बनरावत समुदायाचे एक बुजुर्ग सदस्य जगत सिंघिंग राजवार यांनी सांगितले.