उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील रैनीत येथील जोशी मठ परिसरात रविवारी हिमकडा कोसळला. यामुळे चमोलीमधून वाहणाऱ्या नद्यांच्या पातळीत अचानक वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली. या नैसर्गिक संकटात जिवीतहानी बरोबर वित्तहानी देखील मोठया प्रमाणावर झाली आहे. काही हायड्रो पावर प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पुराच्या पाण्यात संपूर्ण तपोवन धरण वाहून गेलं आहे. इंडियन एअर फोर्सने केलेल्या प्राथमिक पाहणीतून हे समोर आलं आहे.
हाहाकार आणि जीव वाचवण्याची धडपड; पहा जलप्रलयानंतरची झोप उडवणारी दृश्य
एअर फोर्सच्या टेहळणी विमानाने काढलेल्या फोटोत धौलीगंगा आणि रिषीगंगा नदीवर बांधण्यात आलेले धरण उद्धवस्त झाल्याचे दिसत आहे. तपोवन आणि मालारी खोऱ्याजवळच्या प्रवेशद्वारावरील दोन पूलही वाहून गेले आहेत.
आणखी वाचा- बोगद्यातील छिद्र आणि मोबाइल फोन ठरला ‘त्या’ १६ मजुरांसाठी तारणहार
जोशीमठ आणि तपोवनला जोडणारा रस्ता शाबूत आहे. पण खोऱ्यातील झोपडयांच नुकसान झालं आहे. नंदा देवी हिमकडयापासून पीपलकोटी तसेच धौलीगंगा आणि अलकनंदा नदी किनारी मातीचा ढिगारा मोठया प्रमाणात जमा झाल्याचे एअर फोर्सने सांगितले.
५२० मेगा वॅटचा तपोवन हायड्रो इलेक्ट्रीक प्रकल्प ३ हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत होता. एनटीपीसीच्या मालकीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पस्थळी काम करणारे अनेक जण बेपत्ता आहेत. जवळपास १७० जण बेपत्ता आहेत. रविवारी सकाळी रैनी गावाजवळ रिषीगंगा नदीच्या वर असणारा हिमकडा कोसळल्यामुळे ही नैसर्गिक आपत्ती ओढवली.
तपोवन विष्णूगड प्रकल्पाच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. परिस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत, असे एनटीपीसीकडून सांगण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 8, 2021 11:10 am