उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे गुरुवारी सकाळी झालेल्या ट्रेन आणि स्कूल व्हॅनच्या भीषण अपघातात १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जेव्हा दुर्घटनास्थळी भेट देण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. शाळकरी विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्यूमुळे संतप्त झालेले नागरीक आंदोलन करत असताना खरंतर योगींनी संयम बाळगून त्यांना आधार देणे अपेक्षित होते. पण आंदोलकांना पाहून योगींचा पारा चढला. घोषणाबाजी बंद करा, तुमची नौटंकी बंद करा असे योगींनी उपस्थितांना सुनावले. संतप्त आंदोलकांनी योगींना दुर्घटनास्थळी जाण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न केला.

कुशीनगर येथे मानवरहीत रेल्वे क्रॉसिंगवर आज सकाळी हा भीषण अपघात झाला. वेगात आलेल्या ट्रेनने स्कूल व्हॅनला धडक दिली. या दुर्घटनेत १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. आठ जण जखमी झाले. गोरखपूरपासून ५० किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. ट्रेन सिवानहून गोरखपूरच्या दिशेने जात होती.

या घटनेसंदर्भात सर्वतोपरी वैद्यकीय मदत देण्याचे आदेश योगींनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर या घटनेच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिले आहेत.