सेवानिवृत्तीच्या वयाबाबतचा वाद
सेवानिवृत्तीचे वय आणि टेट्रा ट्रक घोटाळ्यावरून माजी लष्करप्रमुख जन. व्ही. के. सिंग यांनी पंतप्रधान कार्यालयाला कायदेशीर कारवाईत खेचण्याचे ठरविले असून या सर्व प्रकारांमागे पंतप्रधान कार्यालयातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याचा हात असल्याचा आरोप केला आहे.
सेवानिवृत्तीच्या वयावरून निर्माण झालेल्या वादात दुसऱ्यांदा सुनावणी झाल्यानंतर मीडियाला आपण पदावरून दूर व्हावे, असे वाटत असल्याचा दावा जन. सिंग यांनी आपल्या ‘करेज अ‍ॅण्ड कन्व्हिक्शन्स’ या अलीकडेच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात केला आहे.
तथापि, तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेतल्यानंतर पाटील यांनी आपल्याला काम करीत राहण्याचा आदेश दिल्याचे सिंग यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता स्पष्ट केले. सेवानिवृत्तीच्या वयाचा वाद निर्माण करण्यामागे पंतप्रधानांच्या कार्यालयातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याचा हात असल्याचा संशय होता. टेट्रा ट्रकबाबतच्या फायली आपण अडकवून ठेवल्यानंतर या अधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा सुरू झाली होती, असेही सिंग यांनी म्हटले आहे.