व्ही.सतीश यांच्याकडे महासचिवपदाची जबाबदारी?

सर्वाधिक काळ भाजपचे संघटन महासचिव असलेले रामलाल आता पूर्ववेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात परतले आहेत. रामलाल यांची अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विजयवाडा येथे संघाच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर शनिवारी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. रामलाल यांच्या जागी व्ही. सतीश म्हणजेच सतीश वेलणकर यांच्याकडे संघटन महासचिव पदाची जबाबदारी दिली शक्यता आहे. मात्र हा निर्णय भाजप घेईल असे सांगत संभाव्य नव्या नियुक्तीवर भाष्य करण्याचे अरुण कुमार यांनी टाळले.

रामलाल २००६ पासून म्हणजे १३ वर्षे ते संघटनमंत्री होते. संघामध्ये प्रचारकांकडे विविध स्वरूपाची जबाबदारी दिली जाते. रामलाल यांच्याकडे संघटनमंत्री पदाचा कार्यभार देण्यात आला होता. संघामध्ये नित्यनियमाने खांदेपालट होत असतात. त्यानुसार हा बदल झालेला आहे, असे अरुण कुमार यांनी सांगितले. संघटनमंत्री वा संघटन महासचिव भाजप व संघ यांच्यातील दुवा असतो. महासचिव या नात्याने संघटनमंत्री भाजपमध्ये कार्यरत असला तरी त्याचे उत्तरदायित्व संघाशीच असते. त्यामुळे संघटन महासचिवाला भाजपमध्ये अत्यंत महत्त्व असते. रामलाल यांना संघटनमंत्री पदावरून दूर करण्यामागे कोणतेही विशिष्ट कारण नसल्याचा दावा अरुण कुमार यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकेककाळी संघटन महासचिव होते. गोविंदाचार्य, कुशाभाऊ ठाकरे, संजय जोशी यांनीही संघटकाची जबाबदारी सांभाळली आहे. मोदी यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे संघातून दूर गेलेले संजय जोशी यांच्याकडून रामलाल यांनी संघटन महासचिव पदाची जबाबदारी हाती घेतली होती. संघटनमंत्री म्हणून रामलाल यांच्या कामाचे भाजप आणि संघात नेहमीच कौतुक केले गेले. त्यांचा सर्व राज्यांमधील संघाचे प्रचारक आणि भाजप कार्यकर्त्यांशीही संपर्क असे. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे रामलाल यांचा भाजपच्या निर्णयप्रक्रियेतील सकारात्मक सहभाग मोदी-शहा यांच्या निर्णयावर संघाने केलेले शिक्कामोर्तब मानले जात असे.

संघटनमंत्र्याची जबाबदारी आता अन्य व्यक्तीकडे सोपवण्याची विनंती रामलाल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्राद्वारे केलेली होती. लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत आणि या निवडणुकीत भाजपला मोठे यशही मिळालेले आहे. त्यामुळे नव्या व्यक्तीकडे संघटनमंत्री पदाची जबाबदारी देता येऊ शकेल. परिवर्तनाची हीच योग्य वेळ आहे, असे रामलाल यांनी पत्रात नमूद केले आहे. रामलाल यांच्या अधिकाराखाली व्ही. सतीश, सौदन सिंह, शिवप्रकाश, बी. एल. संतोष हे चार सहसंघटन सचिव काम पाहात होते. त्यापैकी मूळचे परभणीचे असलेले व्ही. सतीश यांच्या नावावर संघटन महासचिवपदी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.