तमिळनाडूत करोना प्रतिबंधक लशींचा साठा जवळजवळ संपला असल्याने राज्यातील लसीकरण कार्यक्रम ठप्प होण्याच्या बेतात आहे असे सांगून राज्याच्या वाट्याचा जून महिन्यातील पुरवठा पहिल्या आठवड्यापासून पोहचता करावा, असे आवाहन तमिळनाडू सरकारने केंद्राला केले आहे.

मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी अशा आशयाची विनंती करणारे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना लिहिले असून, चेन्नईनजीकच्या चेंगलपट्टू येथील एकात्मिक लस संकुल (इंटिग्रेटेड व्हॅक्सिन कॉम्प्लेक्स- आयव्हीसी) कार्यरत करावे या राज्याच्या यापूर्वीच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

‘आमच्याजवळील लशींचा साठा जवळजवळ संपला आहे आणि लसीकरण कार्यक्रम ठप्प होण्याच्या बेतात आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन तमिळनाडूला प्राधान्य द्यावे आणि जून महिन्यातील लशींचा पुरवठा पहिल्या आठवड्यापासूनच पोहचता करावा’, असे स्टालिन यांनी या पत्रात म्हटले आहे. १ जूनची तारीख असलेले हे पत्र सरकारने बुधवारी जारी केले.

तमिळनाडूला लोकसंख्येचा आकार व  बाधितांची संख्या यांच्या प्रमाणात लशी मिळालेल्या नसल्याचे आपण याआधीच केंद्राला सांगितले असल्याचे स्टालिन म्हणाले. केंद्र सरकारच्या माध्यमातून होणारा पुरवठा व त्याव्यतिरिक्त होणारा पुरवठा यांद्वारे प्रत्येकी ५० लाख मात्रांची विशेष तरतूद करून ही चूक सुधारली जाऊ शकते, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

राज्यांना करोना लशी मोफत पुरवण्याचे आवाहन

तिरुवनंतपुरम : केंद्र सरकारने सर्व राज्यांना करोना प्रतिबंधक लशी मोफत पुरवाव्यात, असा ठराव केरळ विधानसभेने बुधवारी एकमताने संमत केला. राज्यात लशींची तीव्र टंचाई जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सभागृहात हा ठराव मांडला. लशींचा वेळेत पुरवठा करावा असे आवाहन या ठरावात केंद्राला करण्यात आले आहे.

‘करोनाशी लढा देण्यासाठी सर्वांचे मोफत लसीकरण करणे आवश्यक असून, त्यामुळे समाजातील सर्व घटकांचे या विषाणूपासून संरक्षण सुनिश्चित होईल’, असे जॉर्ज म्हणाल्या. करोनाच्या पहिल्या लाटेमुळे अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला. ‘लसीकरण वेगाने करण्यासाठी आपण आवश्यक ती उपाययोजना केली, तर त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल’, असे सांगून जॉर्ज यांनी या महासाथीचा सामना करण्यात एकत्र येण्याचे आणि सार्वत्रिक लसीकरण सुनिश्चित करण्याचे सर्वांना आवाहन केले.