गुजरातमध्ये ४५ वर्षांपासून पुढच्या वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण आजपासून तीन दिवस थांबवण्यात आलं आहे. कोविशिल्ड या करोना प्रतिबंधक लसींच्या दोन डोसमधलं अंतर वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे लसीकरण थांबवण्यात आल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

या तीन दिवसांच्या कालावधीत १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या ज्या नागरिकांनी नोंदणी केली आहे आणि ज्यांना लसीकऱणासाठीचा मेसेज आला आहे, त्यांचं लसीकरण सुरु राहणार असल्याचं राज्य सरकारक़डून जारी करण्यात आलेल्या पत्रकात सांगितलं आहे.

केंद्र सरकारने काल कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवड्यांवरुन आता १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर ४५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण शुक्रवार, शनिवार, रविवार हे तीन दिवस बंद असणार आहे.

१७ मे पासून हे लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. आत्ता पर्यंत गुजरातमध्ये १.४७ कोटी लोकांनी लस घेतली आहे. आत्तापर्यंत राज्यातल्या १.९ कोटी लोकांना पहिला डोस मिळाला आहे. ३७.८९ लाख लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.