देशात गेल्या ९२ दिवसांत १२ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले असून वेगाने लसीकरण करणाऱ्या देशात भारत समाविष्ट आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेत ९७ दिवसांत हा टप्पा गाठला गेला होता, तर चीनमध्ये १०८ दिवसांत तो गाठला गेला.

देशात एकूण १२ कोटी लोकांना १६ जानेवारीपासून लस देण्यात आली. हा जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आहे. आतापर्यंत १२ कोटी २६ लाख २२ हजार ५९० लोकांना लस देण्यात आली.  त्यासाठी १८ लाख १५ हजार ३२५ सत्रे झाली. ९१ लाख २८ हजार १४६ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली, तर ५७ लाख ८ हजार २२३ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. आघाडीच्या कर्मचाऱ्यांमध्ये १ कोटी १२ लाख ३३ हजार ४१५ जणांना पहिली, तर ५५ लाख १० हजार २३८ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. साठ वर्षे वयावरील ४ कोटी ५५ लाख ९४ हजार ५२२ जणांना पहिली, तर ३८ लाख ९१ हजार २९४ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली. ४५ ते ६० वयोगटातील  ४ कोटी ४ लाख ७४ हजार ९९३ जणांना पहिली, तर १० लाख ८१ हजार ७५९ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली.

आठ राज्यांत ५९.५ टक्के लसमात्रा

एकूण आठ राज्यांत ५९.५ टक्के लसमात्रा देण्यात आल्या असून त्यात गुजरात  १ कोटी ३ लाख ४४८, महाराष्ट्र १ कोटी २१ लाख ३९ हजार ४५३, राजस्थान १ कोटी ६ लाख ९८ हजार ७७१, उत्तर प्रदेश १ कोटी ७ लाख १२ हजार ७३९ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. या राज्यांनी एक कोटी पेक्षा अधिक लसीकरण केले आहे. गुजरातमध्ये १ कोटीचा आकडा १६  एप्रिलला गाठला गेला असून इतर तीन राज्यांनी तो १४ एप्रिलला गाठला आहे.  दरम्यान गेल्या २४ तासांत २६ लाख जणांचे लसीकरण करण्यात आले.