देशात कोविड लसीकरणाचा वेग कायम असून १३ कोटी जणांना ९५ दिवसांत लस देण्यात आली, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेने हे उद्दिष्ट १०१ दिवसात, तर चीनने १०९ दिवसात पूर्ण केले होते. एकूण १३ कोटी १ लाख १९ हजार ३१० मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यासाठी १९ लाख १ हजार ४१३ सत्रे घेण्यात आली.

आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये ९२ लाख १ हजार ७२८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा देण्यात आली. ५८ लाख १७ हजार २६२ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली. आघाडीच्या १ कोटी १५ लाख ६२ हजार ५३५ आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी पहिली मात्रा घेतली असून ५८ लाख ५५ हजार ८२१ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. साठ वर्षे वयावरील ४ कोटी ७३ लाख ५५ हजार ९४२ जणांना पहिली मात्रा देण्यात आली असून ५३ लाख ४ हजार ६७९ जणांनी दुसरी मात्रा घेतली, तर ४५ ते ६० वयोगटात ४ कोटी ३५ लाख २५ हजार ६८७ जणांना पहिली, तर १४ लाख ९५ हजार ६५६ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ  या राज्यात ५९.२५ टक्के मात्रा देण्यात आल्या आहेत.

देशात ९५ व्या दिवशी २९ लाख ९० हजार १९७ मात्रा देण्यात आल्या. त्यात १९ लाख ८६हजार ७११ जणांना पहिली मात्रा देण्यात आली तर १० लाख ३४८६ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली.