४५ वर्षांहून अधिक वयाच्या जास्तीत जास्त लोकांच्या लसीकरणाचे प्रयत्न करण्यासाठी चार दिवसांचा लस उत्सव आयोजित करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तथापि, या विशेष मोहिमेच्या अखेरपर्यंत या लक्ष्यगटाधील केवळ एकतृतीयांश लोकांचे लसीकरण झाल्यामुळे गाजावाजा झालेल्या या उत्सवाचे पडघम क्षीणच ठरले!

मंगळवारच्या २५ लाख मात्रांच्या तुलनेत बुधवारी लसीकरणाचे प्रमाण वाढून २९ लाख इतके झाले असले, तरी ११ ते १४ एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीतील सरासरी २९ लाख मात्रांची होती. गंमत म्हणजे, लस उत्सवापूर्वीच्या चार दिवसांत लशींच्या मात्रांची दैनंदिन सरासरी ३३ लाख इतकी होती, असे को-विन संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येते.

५ एप्रिल रोजी लसीकरणाने ४५ लाख इतकी संख्या गाठली होती. लसीकरणाच्या मोहिमेची गती कमी होण्याचे कारण लशींचा तुटवडा की लसीकरण करून घेण्याबाबत लोकांची अनिच्छा हे स्पष्ट झालेले नाही. राज्य सरकारांजवळ लशींचा पुरेसा साठा असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे असल्यामुळे, निश्चित आकडेवारीचा अंदाज घेणे कठीण आहे. १३ एप्रिलपर्यंत सरकार असे सांगितले की राज्यांजवळ १.७ कोटी लशी असून २ कोटी लशी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या बेतात आहेत. मात्र निरनिराळ्या राज्यांत लस मुळीच उपलब्ध नसल्याचे लसीकरण केंद्रांनी म्हटले आहे.

अमेरिकेत देण्यात आलेल्या सुमारे १९.५ मात्रांच्या तुलनेत भारतात लशींच्या ११.२ कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत. याचाच अर्थ, लसीकरण झालेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात भारताची कामगिरी बरीच उणी आहे.

उदासीन प्रतिसाद?

‘अवरवर्ल्डइनडेटा’च्या आकडेवारीनुसार, ब्रिटन व अमेरिका यांनी १०० लोकांमागे सुमारे ५८ मात्रा दिलेल्या असताना, १३ एप्रिलपर्यंत भारतात १०० लोकांमागे फक्त ८ मात्रा देण्यात आल्या होत्या.