करोना व्हायरसवरील लसीचे मोठया प्रमाणावर उत्पादन सुरु केल्यानंतर बांगलादेशला प्राधान्याने लसीचा पुरवठा करु, असे परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला बुधवारी ढाक्यामध्ये म्हणाले. बांगलादेश आमच्यासाठी महत्त्वाचा असून त्यांना नेहमीच आमचा अग्रकम राहिला आहे असे शृंगला पत्रकारांना म्हणाले. ते बांगलादेश दौऱ्यावर गेले होते. बांगलादेश बरोबर द्विपक्षीय संबंध किती महत्त्वाचे आहेत, तेच भारताने यातून संकेत दिले आहेत.

चीनने बांगलादेशच्या नागरिकांवर लसीची मानवी चाचणी करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण बांगलादेशने त्यांचा प्रस्ताव नाकारला. चीनमधील कंपन्यांनीही करोनाविरोधात लसीची निर्मिती केली आहे. चीन सार्क परिषदेतील भारताच्या मित्र राष्ट्रांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी मुत्सद्दी पातळीवर चीनकडून वेगवेगळी प्रलोभने दाखवली जात आहेत. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर बांगलादेशला आपल्या बाजूला वळवण्यासाठी चीनने त्यांना व्यापारात अनेक सवलती दिल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

भारत आणि बांगलादेशचे ऐतिहासिक संबंध आहेत. बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारताचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. रणनितीक दृष्टीने बांगलादेश भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. लसीवरुनही आता राजकारणाचा खेळ सुरु आहे. अनेक पाश्चिमात्य देशांनी लसीची निर्मिती किंवा खरेदी केल्यानंतर सर्वप्रथम आपल्या देशातील नागरिकांना लसीचे डोस देणार असल्याचे म्हटले आहे.

भारत आणि चीन दोघेही लसीच्या माध्यमातून आपला प्रभाव विस्तारण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये स्वदेशी लस निर्मितीचे वेगवेगळे प्रकल्प सुरु आहेत. लस उत्पादन क्षेत्रात भारत आघाडीवर आहे. भूतान आणि मालदीव या दोन्ही देशांना लसीचे डोस उपलब्ध करुन देण्याचे भारताने आश्वासन दिले आहे.