गेले काही महिने विकसित देशांनी करोना प्रतिबंधक लशी व कच्च्या मालाची साठेबाजी केली. पण आता भारतात करोनाची दुसरी लाट व विषाणूत नवी उत्परिवर्तने आली असताना आपल्यालाही यातून धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात आल्याने त्यांनी आता करोना लशी व लशीचा कच्चा माल पुरवण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेने आधी ‘अमेरिका फस्र्ट’ अशी भूमिका घेतली होती पण आता त्या देशानेही लस पुरवण्याचे आश्वसन दिले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी ४५ मिनिटे संभाषण केल्यानंतर लशी व कच्चा माल तसेच इतर औषधे उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. युरोपीय देशांनीही दक्षिण आफ्रिकेत नवीन रुग्ण सापडत असल्याने लशीच्या बाबतीत खुली भूमिका घेतली आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस पुरवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लशीला अमेरिकेत परवाना अजून मिळालेला नाही, ती लस त्यांनी देण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेने आता औषध कंपन्यांची बैठक घेऊन कोविड लशींसाठी बौद्धिक संपदा हक्क माफ करण्याची तयारीही केली आहे. दक्षिण आफ्रिका व भारत यांनी आधी ही मागणी केली होती, तेव्हा अमेरिकेचा त्याला विरोध होता. पण नवीन अवताराचे विषाणू आपल्याकडेही येऊ शकतात, या भीतीतून त्यांनी आता मोकळेपणाची भूमिका स्वहितातून घेतली आहे.

लस राष्ट्रवाद अनेक श्रीमंत देशांनी उराशी बाळगला होता पण तो अंगाशी येण्याची लक्षणे दिसताच त्यांनी तो गुंडाळला आहे. पण त्यांनी आधीच भारतासारख्या देशांना लस पुरवठा नाकारून चूक करून ठेवली आहे. आता त्याचे धोके त्यांना कळून चुकले आहेत. १.३ अब्ज लोकसंख्येच्या भारत देशात दुसरी लाट ही जास्त हानिकारक विषाणूमुळे पसरली, असे काही वैज्ञानिकांचे मत असून त्यामुळे विषाणूंना नवे अवतार धारण करण्यास अनुकूल परिस्थिती मिळाली. सध्या ब्रिटनपासून इस्राायलपर्यंत ज्या लशी दिल्या जात आहेत, त्यांना दाद न देणारा विषाणू भारतात तयार झाला, तो दुहेरी उत्परिवर्तनाचा आहे.

नवी दिल्ली व वॉशिंग्टन येथील सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी या संस्थेचे संस्थापक रमणन लक्ष्मीनारायणन यांनी सांगितले की, भारतासारख्या देशात विषाणूचे नवे प्रकार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर देशांना नंतर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भारताला करोनातून बाहेर काढणे ही आता इतर देशांची गरज आहे. भारतात बी. १.६१७ या विषाणूच्या प्रकाराने थैमान घातले. त्यात दोन घातक उत्परिवर्तने आहेत. विशेष म्हणजे जगात हा विषाणू जास्त संसर्गजन्य आहे. सीएसआयआरच्या जिनॉमिक इन्स्टिट्यूटचे संचालक अनुराग अगरवाल यांच्या मते नवी दोन उत्परिवर्तनांचा विषाणू हा प्रतिकारशक्तीला चकवा देणारा आहे. हैदराबाद येथील सेंटर फॉर मॉलिक्युलर बायॉलॉजी या संस्थेचे संचालक राकेश मिश्रा यांनी सांगितले की, दुहेरी उत्परिवर्तनचा विषाणू जास्त संसर्गजन्य आहे. पण त्यामुळे जास्त मृत्यू घडून येण्याची शक्यता कमी आहे.