देशात एक मार्चपासून कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून पात्र व्यक्तींनी त्यांची नावनोंदणी को-विन २.० उपयोजनावर करायची नसून पोर्टलच्या माध्यमातून करायची आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. को-विन अ‍ॅप हे प्ले स्टोअरवर उपलब्ध असून ते फक्त प्रशासकांसाठी आहे. लस घेण्यास पात्र व्यक्तींनी पोर्टलच्या माध्यमातून नावनोंदणी करायची आहे.

मंत्रालयाने  ट्विट संदेशात म्हटले आहे, की लसीकरण नोंदणी व वेळेची नोंदणी कोविन पोर्टल ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू कोविन डॉट गव्ह डॉट इन’ येथे लसीकरणासाठी नोंदणी करायची आहे. प्लेस्टोअरवरील उपयोजन हे प्रशासकांसाठी आहे. सरकारने बुधवारी असे जाहीर केले होत, की तिसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून साठीवरील  व्यक्ती तसेच ४५ वर्षे व त्यावरील वयोगटातील सह आजाराच्या व्यक्तींना लस देण्यात येईल. त्यासाठी आता कोविन पोर्टल ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट कोविन डॉट गव्ह’ उपलब्ध करण्यात आले आहे. आरोग्य सेतूच्या माध्यमातूनही लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे.  लाभार्थी थेट लसीकरण केंद्रात येऊन ओळख पटवून लस घेऊ शकतात. पात्र व्यक्ती त्यांच्या पसंतीचे ठिकाण  व वेळ उपलब्धतेनुसार निवडू शकतात. साठ वर्षे वयावरील सर्व नागरिक लसीकरणास पात्र आहेत. या शिवाय वीस सहआजार असलेले ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्तीही लसीकरणास पात्र आहेत. नागरिकांनी कोविन पोर्टलवर नोंदणी करायची असून ती मोबाईल क्रमांकाच्या मदतीने करता येईल. या वेळी वन टाइम पासवर्ड दिला  जाईल. कोविनवर खाते सुरू करून मोबाइल क्रमांकाच्या मदतीने नोंदणी व वेळ घेता येणार आहे. लाभार्थीना आयडी कार्डचा प्रकार व क्रमांक दिला जाईल.

ही कागदपत्रे आवश्यक

ऑनलाइन नोंदणीसाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, एनपीआर स्मार्ट कार्ड, पेन्शन कागदपत्रे (छायाचित्रासह) ग्राह्य़ धरली जातील. ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना सह आजाराचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.