11 August 2020

News Flash

लशीची घाई धोकादायक : शास्त्रज्ञांचा इशारा

आयसीएमआर म्हणजे भारतीय वैद्यक संशोधन संस्थेने लस स्वातंत्र्य दिनापर्यंत आणण्याची केलेली घोषणा आशादायी असली तरी त्यात धोकाही आहे.

संग्रहित छायाचित्र

करोना अर्थात कोविड १९ वर  भारतात निर्माण केलेली लस स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर जारी करण्याच्या सरकारच्या खटाटोपावर देशातील वैज्ञानिकांनी धोक्याचा इशारा दिला आहे. आयसीएमआरने पुढील महिन्यात करोनावरची स्वदेशी लस स्वातंत्र्य दिनापर्यंत तयार झालीच पाहिजे, असे फर्मान संबंधित औषध कंपन्या, रुग्णालये व वैज्ञानिक संस्था यांना सोडल्याने त्यावर टीका करण्यात आली आहे.

वैज्ञानिकांनी याबाबत  म्हटले आहे की, लशीची खूप निकड असली, तरी  ती तयार करण्यासाठी अनेक महिने लागत असताना दोन महिन्यांच्या कालावधीत ती तयार करायला सांगणे, यात कुठलाच समतोल दिसत नाही. आयसीएमआर म्हणजे भारतीय वैद्यक संशोधन संस्थेने लस स्वातंत्र्य दिनापर्यंत आणण्याची केलेली घोषणा आशादायी असली तरी त्यात धोकाही आहे.

प्रतिकारशक्ती विषयक तज्ज्ञ सत्यजित रथ यांनी सांगितले की, आयसीएमआरचे पत्र अयोग्य असून त्याची भाषा, आशय हा तांत्रिकदृष्टय़ा वास्तववादी पातळीशी मेळ खाणारा नाही. दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनॉलॉजीचे प्रा. रथ यांनी या चाचण्यांकडे आपण आशादायी दृष्टिकोनातून पाहत असल्याचे स्पष्ट केले असून पुढे म्हटले आहे की, सार्स सीओव्ही लस घटक व त्याच विषाणूवरील डीएनए लस घटक आपण तयार केले आहेत. ही चांगली प्रगती आहे पण त्याचे निकाल काय येतात याची वाट बघावी लागेल.

‘वैज्ञानिकदृष्टय़ा अतार्किक’

मुंबई : सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इंडियन जर्नल ऑफ मेडिकल एथिक्सचे संपादक अमर जेसानी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, ‘लसीचा पहिला आणि दुसरा टप्पा एकत्रितरित्या करण्यात येणार असून तो ही इतक्या कमी वेळात राबविण्याची सूचना वैज्ञानिकदृष्टय़ा अतार्किक आहे. वैद्यकीय चाचण्यांचा तिसरा टप्पा महत्वाचा असून यात मोठय़ा संख्येने दोन गटामध्ये या लसीच्या परिणामकता तपासली जाते. यात एका गटाला लस दिली जाते आणि दुसऱ्या गटाला न देता यामधील बदल नोंदविले जातात. याला किमान तीन ते चार महिन्याचा कालावधी लागतो. त्यानंतरच लस सार्वजनिकरित्या उपलब्ध केली जाते. परंतु आयसीएमआरच्या निर्णयामध्ये हा तिसरा टप्पा पूर्णपणे वगळून थेट लस उपलब्ध  करण्याचे आदेश आहेत. लसनिर्मिती हे वैज्ञानिक संशोधन असून जगाचे डोळे याकडे लागले आहेत. राजकीय धोरणामुळे यातील काही टप्पे वगळले किंवा अतिघाई  केल्यास हे संशोधन अपयशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा देशातील वैज्ञानिकांच्या विश्वासार्हतेचा देखील प्रश्न आहे.’

घोषणा स्वागतार्ह, पण..

विषाणूतज्ज्ञ उपासना राय यांनी सांगितले की, करोना विषाणूविरोधात लस तयार करण्याची घोषणा स्वागतार्ह आहे पण आपण त्यात जास्त घाई करीत नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. वैज्ञानिक व कंपन्यांवर जास्त दबाव टाकून सार्वजनिक वापरासाठी चांगली लस तयार करू शकू अशातला भाग नाही. उपासना राय या कोलकात्यातील आयआयसीबी-सीएसआयआर या संस्थेत वरिष्ठ वैज्ञानिक आहेत. त्यांनी सांगितले की, लस तयार करण्यासाठी १२ ते १८ महिने हे वैद्यकीय चाचण्यांसाठी लागतात. १५ ऑगस्ट या मुदतीचा विचार केला तर कंपन्यांकडे चाचण्यांसाठी एक महिनाच आहे. इतकी कमी मुदत त्यांनी कशी दिली. इतक्या कमी वेळात सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण होतील याचे पुरावे कोण देणार आहे. यातील सुरक्षा व औषध विकास तसेच इतर टप्प्यांचे काय, वैद्यकपूर्व अभ्यास तरी पूर्ण करण्यात आला आहे का, त्यामुळे जर जास्त घाई केली जात असेल तर त्यात जोखीम आहे यात शंका नाही. लशीमुळे किती प्रमाणात प्रतिपिंड तयार होतात याची चाचणी महत्त्वाची असते. त्यालाच महिना ते दोन महिने लागतात. नंतर लशीच्या सुरक्षा चाचण्या करून मग मानवी चाचण्यांना लस सिद्ध होते. काही काळ वाट पाहायलाच पाहिजे.

कमी काळात अचूक चाचण्या अशक्य – जमील

या सगळ्या घटनाक्रमावर वेलकम ट्रस्ट व डीबीटी इंडिया अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विषाणूतज्ज्ञ शाहीद जमील यांनी सांगितले की, कुठल्याही लशीच्या सुरक्षा व प्रतिकारशक्ती चाचण्या चार आठवडय़ांत अचूकपणे केल्या जाऊ शकत नाहीत.

‘या वर्षांत तरी लस अशक्य’

हैदराबाद : कोविड १९ विषाणूवर या वर्षांत तरी लस येणे शक्य नाही, असे मत हैदराबादच्या सीसीएमबी या सीएसआयआर संचालित संस्थेचे प्रमुख राकेश के. मिश्रा यांनी व्यक्त केले आहे. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजी या संस्थेचे संचालक असलेल्या मिश्रा यांनी म्हटले आहे की, आयसीएमआरने लशीच्या चाचण्यांबाबत घाई करण्यासाठी जे पत्र लिहिले तो अंतर्गत संवादाचा  भाग असू शकतो. त्यात मानवी चाचण्या वेगाने करण्याचा हेतू असेल. पण जरी सगळे काही पुस्तकी आदर्शानुसार पार पडले तरी अजून लस येण्यास सहा ते आठ महिने तरी लागतील याचा अर्थ या वर्षी तरी लस उपलब्ध होणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 12:23 am

Web Title: vaccine rush is dangerous scientists say abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 भाजपसाठी संघटना फक्त निवडणुकीचे यंत्र नव्हे- मोदी
2 मुंबईसह सहा शहरांतील विमानांना कोलकात्यात बंदी
3 जोश इज हाय! घातक अपाचे, मिग २९ प्रहार करण्यासाठी सज्ज
Just Now!
X