करोना विरोधातील लढ्यात लस हे सर्वात मोठे शस्त्र असल्याचे सांगून, जास्तीत जास्त व्यक्तींना लस घेण्यास प्रेरित करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉक्टरांना केले.

करोनाबाबत देशातील परिस्थिती आणि लसीकरणाची प्रगती याबाबत पंतप्रधानांनी देशातील प्रमुख डॉक्टरांशी  आभासी संवाद साधला. छोट्या शहरांमध्ये सध्या करोनाचा वेगाने फैलाव होत असल्याचे नमूद करतानाच, तेथे काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि करोना संदर्भातील सर्व नियमांचे योग्यप्रकारे पालन होत असल्याचे निश्चित करण्यासाठी त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करावे, असे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले.

कोविडवरील उपचार व प्रतिबंध याबाबतच्या अफवांविरुद्ध लोकशिक्षण करावे असे आवाहनही मोदी यांनी डॉक्टरांना केले. सध्याच्या कठीण काळात घबराटीचे बळी न ठरणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. यासाठी योग्य त्या उपचारासोबतच, रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या समुपदेशनावरही त्यांनी भर दिला, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

आणीबाणीची परिस्थिती नसेल, अशावेळी इतर रोगांच्या उपचारासाठी टेली- मेडिसिनचा वापर करण्याची सूचनाही मोदी यांनी डॉक्टरांना केली.

आवश्यक औषधे व इंजेक्शन्स यांचा पुरवठा आणि प्राणवायूची पुरेशी उपलब्धता यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारने अलीकडेच घेतले आहेत आणि राज्यांना या संबंधात आवश्यक ते दिशानिर्देश देण्यात आले आहेत, याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.