मोदी सरकारच्या लसीकरणाच्या धोरणावर विरोधक सातत्याने टीका करत आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला फटकारत लस धोरण सादर करण्यास सांगितलं होतं. दरम्यान, मोदी सरकारने काल (७ जून) १८ वर्षांपुढील सर्वांचं केंद्र सरकार मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर काही प्रश्न उपस्थित करत चिदंबरम यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं होतं. सरकारवर टीका करताना झालेल्या चुकीबद्दल आता चिदंबरम यांनीच खुलासा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (७ जून) लसीकरणासंदर्भात मोठी घोषणा केली. १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकार घेणार आहे. २१ जूनपासून केंद्र सरकार लस उत्पादक कंपन्यांकडून लसीची खरेदी करून राज्यांना पुरवेल. त्यामुळे राज्यांना लसीसाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. काही राज्यांनी लस खरेदीसाठी परवानगी मागितली होती. त्यामुळे राज्यांना परवानगी देण्यात आली होती, असंही पंतप्रधान म्हणाले होते.

पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. मात्र, टीका करताना चिदंबरम यांनी मोदी सरकारने खोटा आरोप केल्याचा म्हटलं होतं. पंतप्रधान मोदी आता राज्य सरकारांना दोष देत आहेत. केंद्र सरकारने लस खरेदी करु नये, असं कुणीही म्हटलेलं नाही,” असं म्हणत चिदंबरम यांनी मोदींना लक्ष्य केलं होतं.

Free Covid Vaccine: दुर्दैवाने मोदींनी फार उशीरा निर्णय घेतला असून….; ममता बॅनर्जींची टीका

या टीकेनंतर चिदंबरम यांनी आता एक ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी काल सरकारवर टीका करता झालेली चूक मान्य केली आहे. “राज्य सरकारला थेट लस खरेदी करण्याची परवानगी द्या, अशी मागणी कोणत्या राज्य सरकारने केली होती. याची माहिती एएनआयकडे विचारली होती. सोशल मीडियावरील एका कार्यकर्त्यांने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे अशा पद्धतीची विनंती केल्याचं पत्र पोस्ट केलं. मी चुकलो. मी माझी भूमिका दुरुस्त केल आहे,” असा खुलासा चिदंबरम यांनी ट्विट करून केला आहे.

सर्वाना मोफत लस!; केंद्राकडून धोरणबदल, पंतप्रधानांची घोषणा 

पंतप्रधानांवर टीका करताना चिदंबरम काय म्हणाले होते?

१८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेत असल्याची घोषणा केल्यानंतर चिदंबरम यांनी मोदींवर निशाणा साधला होता. “केंद्र सरकार आपल्या चुकांमधून शिकले आहे, हाच या घोषणेमागचा गर्भित अर्थ आहे. त्यांनी दोन चुका केल्या आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न केला. पण नेहमीप्रमाणे दिशाभूल करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतःच्या चुकांसाठी विरोधकांना दोषी ठरवलं. केंद्राने लस खरेदी करू नये असं कुणीही म्हणालं नव्हतं. आता राज्यांवर आरोप करत म्हणताहेत की, राज्यांना थेट लस खरेदी करायची होती. त्यामुळे केंद्राने परवानगी दिली. चला जाणून घेऊन या की, लस खरेदी करण्याची परवानगी द्या असं म्हणत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी, कोणत्या राज्य सरकारने, कोणत्या तारखेला मागणी केली होती,” असं चिदंबरम म्हणाले होते.